LIVE : नयना गँगरेप प्रकरणी वकिलांकडून निर्भयाचा दाखला
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 09 May 2017 08:17 AM (IST)
पुणे : पुण्यातील नयना पुजारी बलात्कार आणि हत्येप्रकरणी तिन्ही दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. आरोपी योगेश राऊत, महेश ठाकूर आणि विश्वास कदम या तिघांवर बलात्कार, हत्या, अपहरण आणि चोरीचा आरोप सिद्ध झाला आहे. माफीचा साक्षीदार राजेश चौधरीची सुटका करण्यात आली. कोर्टात काय झालं? शिक्षेची सुनावणी सकाळी 11 वाजता होणार होती. मात्र पोलिसांनी तासभर आधीच आरोपींना कोर्टात हजर केलं होतं. न्यायाधीशांनी योगेश राऊतला समोर बोलावून 'शिक्षेबद्दल काही बोलायचं आहे का?' असं विचारलं. 'मला या गुन्ह्यात गोवण्यात आलं आहे. मी गुन्हा केलेला नाही. गुन्ह्यात वापरलेली गाडी त्या दिवशी माझ्याकडे नव्हती. मला एक मुलगी, पत्नी आणि आई आहे. शिक्षा देताना त्याचा विचार व्हावा.' असं योगेश म्हणाला. 'माफीचा साक्षीदार झालेला राजेश चौधरीही गुन्ह्यात सहभागी होता. आम्हाला जर शिक्षा द्यायची असेल तर त्यालाही द्या.' अशी मागणीही योगेश राऊतने केली. महेश ठाकूरलाही न्यायाधीशांनी पुढे बोलावून शिक्षेबाबत विचारलं, मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला. विश्वास कदमला विचारलं असता हा गुन्हा माफीचा साक्षीदार झालेल्या राजेश चौधरीने केल्याचा दावा त्याने केला. त्यामुळे राजेश चौधरीलाही शिक्षा देण्याची मागणी विश्वास कदमने केली. तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करताना सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी यापूर्वी घडलेल्या अनेक प्रकरणांचे आणि त्यामध्ये न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचे दाखले दिले. सरतेशेवटी मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील निर्भया प्रकरणात सुनावलेल्या शिक्षेचा दाखला दिला.