पुणे: नयना पुजारी हत्याकाडांमध्ये आरोपींवर खून, बलात्कार, अपहरण आणि चोरीचे दोष सिद्ध झाले आहेत. मंगळवारी याप्रकरणी शिक्षेची सुनावणी होईल.
आरोपी योगेश राऊत , महेश ठाकूर आणि विश्वास कदम यांना कडक शिक्षेची मागणी नयनाच्या कुटुंबीयांनी केली आहे.
आरोपी योगेश राऊत , महेश ठाकूर आणि विश्वास कदम या तीन आरोपींना आज न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आलं. मात्र माफीचा साक्षीदार राजेश चौधरीला पोलिसांनी अद्यापही हजर केलेलं नाही. त्यामुळे कामकाज सुरु होण्यास विलंब झाला.
पोलिसांच्या ढिसाळपणावर ताशेरे ओढत न्यायाधीशांनी आरोपींना न्यायालयात आणण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले.
काय आहे नयना पुजारी हत्याकांड?
7 ऑक्टोबर 2009 साली सिनिक्रॉन या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करणाऱ्या नयना पुजारीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिचे अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणी योगेश राऊत या मुख्य आरोपीला अटक केल्यानंतर या खटल्याला सुरुवात झाली. गेल्या 7 वर्षांपासून या खटल्याची सुनावणी सुरु होती.
अटकेनंतर एकदा योगेश राऊत हा रुग्णालयातून पळून गेला होता. दीड वर्षे दिल्लीत वेशांतर करुन राहणाऱ्या योगेशला शिर्डीमध्ये पोलिसांनी अटक केली होती.
शिवाजीनगरच्या सत्र न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. दरम्यान आरोपीला कठोर शिक्षा मिळेल असा आशावाद नयनाचे पती अभिजीत पुजारी यांनी व्यक्त केला आहे.