पिंपरी चिंचवड : शर्यतींच्या घाटात गाड्याला बैलजोडी (Bail Gada Sharyat) जुंपताना भल्याभल्यांची तारांबळ उडते. महिला तर या घाटाच्या (Bullock Cart Race) आसपासही फिरकत नाहीत. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील दहावीत शिकणारी दिक्षा पारवे ही रणरागिणी मात्र याला अपवाद ठरली. तिने घाटात थेट बैल जुंपण्याचं धाडस केलं. उंचखडक घाटातील तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.


शर्यतीच्या घाटात गाड्याला बैलजोडी जुंपणारी, उसळत्या बैलावर क्षणात नियंत्रण मिळवणारी, घोडीवर स्वार झालेली ही रणरागिणी आहे पुण्याच्या जुन्नरची. दिक्षा पारवे, वय अवघं 16 वर्षे. ज्या घाटात भल्याभल्यांची भंबेरी उडते त्या घाटात दिक्षा नुसती उभीच राहिली नाही तर तिने गाड्याला बैल जुंपण्याचं यशस्वी धाडस केलं. 


दिक्षाने विज्याला (बैलाचं नाव) आवाज दिला की तो लगेच जवळ येतो. शर्यतीला जायचंय का असं विचारताच, तो मान डोलवत होकार ही देतो. दहावीच्या परीक्षेचा अभ्यास ही विज्याच्या साक्षीनेच करते. विज्यासोबतचा तिचा हा लळा पाहून दिक्षाची आई सुद्धा अचंबित होते. दिक्षासह तिच्या बहिणी प्रियांका आणि दिव्या यांच्यावर बैलजोडीच्या सांभाळाची जबाबदारी आहे. शिक्षण करत-करत त्या ही जबाबदारी सक्षमपणे पेलत आहेत. 


पारवे कुटुंबियांच्या दोन पिढ्यांना बैलगाडा शर्यतींचा मोठा छंद होता. पण तिसऱ्या पिढीत सलग सात मुली जन्मल्या. मग काय त्यातील या तिघींनी कुटुंबातील शर्यतीची परंपरा कायम जोपासली. त्यामुळेच आठ वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा शर्यतींना सशर्त परवानगी दिली तेंव्हा या मुली घाट गाजवू लागल्यात.


सोशल मीडियावर दिक्षा कमालीची फेमस झाली आहे. म्हणूनच आज पंचक्रोशीतील मंडळी कौतुकाची थाप द्यायला तिच्या घरी पोहचत आहेत. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी देखील दिक्षाचं कौतुक केलं आहे. दिक्षा अन् तिच्या बहिणींप्रमाणे प्रत्येक महिलेने ठरवलं तर त्या अशा धाडसी क्षेत्रात ही ठसा उमटवू शकतात. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha