पुणे: पुण्यातील हिंजवडीत काल (बुधवारी, ता 20) सकाळी एका टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसला भीषण आग लागून कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बसच्या चालकानेच सहकारी कामगारांच्या त्रासाला कंटाळून आग लावल्याचं संतापजनक कारण समोर आलं आहे. चौकशीदरम्यान महत्त्वाची माहिती समोर आल्यानंतर आता हिंजवडी जळीत हत्याकांड प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून पोलिसांनी बस चालक जनार्दन हंबर्डीकर याच्याविरुद्ध कट रचून खून केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, या प्रकरणात आरोपी जनार्दन याला नाहक गोवलं जात असल्याचा आरोप, त्याच्या पत्नी आणि भावाने केला आहे.
वाचलेल्यांपैकी काही जणांना खरचटले देखील नाही...
आरोपी जनार्दन हंबर्डीकर हे पूर्णतः शुद्धीत नसताना पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवलाच कसा असा सवाल उपस्थित करत ज्या बसला आग लागली, त्यामध्ये आरोपी जनार्दनचे सख्खे भावजी देखील होते, त्यामुळे ते आग कशी लावतील शिवाय घटनेत वाचलेल्यांपैकी काही जणांना खरचटले देखील नाही, त्यामुळे पेटत्या बसमधून ते सुखरूप बाहेर कसे पडले? आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार जनार्दन यांनी बसला आग लावण्यासाठी केमिकल आणतांना त्यांना कंपनीतील कुणीच का रोखले नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित करत, जनार्दन हंबर्डीकरच्या कुटुंबियांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. माझा भाऊ निर्दोष असताना देखील त्याला या प्रकरणात गोवलं जात आहे. जर त्याने ते केमिकल कंपनीतून घेतल्याचा दावा केला जातो. पण, ज्या कंपनीतून एक छोटा कागद घेऊन जाऊ शकत नाही त्या कंपनीतून त्याने हे केमिकल कसं नेलं. ते कॅन नेत असताना त्याला का अडवलं गेलं नाही. हा माझा अक्षेप आहे. सकाळीपासून तो स्टेबल नसताना पोलिसांनी त्याची दोन ते अडीच तास काय माहिती घेतली. त्याची स्थिती ठिक नसताना पोलिस त्याच्याकडून अडीच ते तीन तास स्टेटमेंट घेतात. त्या गाडीमध्ये एक महिला आणि बाकी सर्व पुरूष होते. जर त्याने गाडी लॉक केली तर त्यामध्ये तीन लोक असे आहेत की त्यांना खरचटल देखील नाही. जर त्याने दरवाजा लॉक केला असताना तर मग हे लोक कसे बाहेर आले, असा सवाल चालक जनार्दन हंबर्डीकरचा भाऊ यांनी म्हटलं आहे.
त्या बसमध्ये माझे भाऊजी
गाडी लॉक होती तर इतर वाचलेले सहा ते सात जण बाहेर कसे आले मग? दरवाजा उघडा नव्हता तर बाकी कसे बाहेर आले असते. एखादा दुसरा खिडकी तोडून बाहेर आले असते. पण सगळेच खिडकी तोडून बाहेर आले नसते, त्या बसमध्ये माझे भाऊजी विश्वास खानविलकर देखील होते. ते सर्वजण बाहेर पडल्यानंतर ते सर्वात शेवटी बाहेर पडले होते. दरवाडा उघडा होता त्यामुळे ते बाहेर पडले. असा कोणता भाऊ असेल जो आपल्या बहिणीचं कुंकू पुसायला तयार असेल. माझा भाऊ निर्दोष आहे. आम्हाला न्याय मिळावा, असं विजय हंबर्डीकर चालक जनार्दन हंबर्डीकरच्या भावाने म्हटलं आहे.
पत्नी काय म्हणाली?
जी कारणे सांगितली जात आहेत. बोनस मिळाला नाही इतर काही गोष्टी त्यापैकी काहीच माझ्या नवऱ्याने मला सांगितलेलं नाही. मला दिवाळीला त्यांनी पैसे दिले होते. मला दिवाळीला त्यांनी पैसे दिले होते. जर त्यांना पैसे मिळाले नसते तर त्यांनी मला पैसे दिले नसते. ते कामाला जातात तसे मी त्यांना सकाळी सहा वाजेपर्यंत डब्बा बनवून देत होते. ते शुगर पेशंट होते. ते 2006 पासून तिथे होते. जर त्या कंपनीतील लोकांना ते केमिकल घेऊन जाताना दिसले तर त्यांनी त्याबद्दल विचारायला हवं होतं. त्यांना या प्रकरणात गोवलं जात आहे. नक्की काय खरं आहे खोटं आहे याचा तपास झाला पाहिजे माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे असंही चालकाची पत्नी नेहा हंबर्डीकरने मागणी केली आहे.