Pune weather update :  पुणे शहरात तापमानात सतत वाढ होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पुणेकर हैराण झाले आहे. आज पुण्यात 40 अंश सेल्सियसच्या वर तापमानाची नोंद झाली आहे. पुणे शहारातील विविध परिसरात तापमानात तफावत जाणवली. त्यात ढमढेरे परिसरात 42.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली तर शिवाजी नगर परिसरात 39. 7 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. या तापमान वाढीमुळे दुपारी पुण्यातील काही रस्त्यांवर शुकशुकाट होता. 


पुणे शहरासह राज्यात तापमानात मोठी वाढ होणार असल्याचं पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आलं होतं. त्यासोबत पुणे शहराचा पारादेखील पुढील तीन दिवस 42 अंशाच्या वर जाईल, असादेखील पुणे वेधशाळेने इशारा दिला होता. राज्यासह पुण्यात मागील काही दिवस अवकाळी पावसानं थैमान घातलं होतं. यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं. मात्र यानंतर आता राज्यात सूर्य आग ओकणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं दिला होता. 


येत्या काही दिवसांत तापमानात वाढ होऊ शकते आणि शहरात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी  मे महिन्यात प्रथमच शिवाजीनगरमध्ये तापमान 40.1 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते, तर शहरातील इतर अनेक भागात 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. ठमढेरे परिसरात 42.6 अंश सेल्सिअस तर कोरेगाव पार्कमध्ये 41.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.


तापमानात का वाढ होत आहे?


महाराष्ट्राच्या उत्तर कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात राजस्थान आणि गुजरातकडून वारे येत आहेत. त्यामुळे उकाडा आणि तापमान वाढल्याचं दिसून येत आहे. विदर्भातदेखील अशीच परिसस्थिती आहे. राज्यभर तापमान वाढणार आहे. पुढील दोन दिवसांनी राज्यात तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यभर शुष्क हवामान राहिल, असंही हवामान विभागानं सांगितलं आहे. अकरा ते अडीच या वेळेत नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि लहानमुलांची काळजी घ्यावी, असं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे. 


उष्णतेची लाट नाही मात्र तापमान वाढण्याची शक्यता...



तापमान वाढत असल्याने पुण्यात उष्णतेची लाट येणार का?, असा प्रश्न अनेक पुणेकरांना पडला होता. मात्र अशी कोणत्याही प्रकारची हिट वेव्ह येणार नसल्याचं हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आेहे. मात्र तसं असलं तरीही पारा वाढणार आहे. किमान तापमान  43 अशं सेल्सियसपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.