पुणे: तब्बल 10 वर्षांनंतर पुण्यातल्या एका हत्येच्या प्रकरणाला वाचा फुटली आहे. 2006मध्ये अर्चना सांगळे यांची हत्या झाली होती. या प्रकरणात आरोपी संतोष कतोरेला पोलिसांनी अटक केली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे आरोपी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात होता, असं पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटलं आहे. त्यामुळं तो पोलिस अधिकारी नेमका कोण? हा प्रश्न विचारला जातो आहे.
अर्चना सांगळे
आरोपी संतोष कतोरे हा पुण्यात एक एनजीओ चालवतो आणि कायदेशीर सल्लाही देत होता. मूळच्या अहमदनगरची असलेल्या अर्चना सांगळेचं पुण्यातल्या एका व्यक्तीशी लग्न झालं होतं. मात्र, त्याच्याशी पटत नसल्यानं ती पतीपासून वेगळी राहत होती. त्याचकाळात तिची संतोषशी ओळख झाली आणि काही दिवसात ते एकत्रही राहू लागले.
पुढे दोघांनी मिळून पुण्याच्या बाणेर भागात फ्लॅट घेतला. याच फ्लॅटवर डोळा असलेल्या संतोषनं अर्चनाच्या हत्येचा कट रचला. अर्चनाला देवदर्शनाला कोल्हापूरला नेल्यानंतर परत येताना मछिंद्रगड येथे त्याने दोन साथीदारांच्या मदतीने अर्चनाचा गळा आवळून खून केला.
दरम्यान, तब्बल 10 वर्षानंतर या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं असून त्याला सध्या पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.