पुणे : पुण्यात एका पीएचडी करणाऱ्या विद्यार्थाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सूस खिंडीत या विद्यार्थ्याच मृतदेह आढळून आला आहे. यासंबंधी पुणे पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
सुदर्शन उर्फ बाल्या बाबुराव पंडीत असं या 30 वर्षीय तरुणाचं नाव आहे. चतुःश्रुंगी परिसरातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत ( NCL) हा विद्यार्थी पीएचडीचे शिक्षण घेत होता. गळा चिरून आणि चेहरा दगडाने ठेचून सुदर्शनची हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह सूस खिंडीत टाकण्यात आला. याबाबत सुदर्शनचा चुलत भाऊ संदीप यांनी चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात खुनासह पुरावा नष्ट करणे व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुदर्शन हा मूळचा जालना जिल्ह्यातील आहे. तो पाषाण परिसरातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) येथे रसायनशास्त्र विषयात पीएचडी करत होता. पीएचडीसाठी तो दीड वर्षांपूर्वी पुण्यात आला होता. सुतारवाडी भागात पेईंग गेस्ट म्हणून राहत होता. शनिवारी सकाळी सूस खिंडीत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या काही नागरिकांना मृतदेह दिसून आला. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर चतुःश्रुंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
सुदर्शन याच्या अंगावरचे कपडे काढून टाकले होते. त्यांच्या चेहरा दगडाने ठेचण्यात आला होता. तर गळ्याही धारधर शस्त्राने चिरण्यात आला होता. खिशात पाकीट सापडले, त्या पाकिटातील कागदपत्रांवरून पोलिसांनी त्याची ओळख पटवली. सुदर्शनच्या हत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही. पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत.