पिंपरी-चिंचवडमध्ये डोक्यात दगड घालून एकाची हत्या, मारेकरी मोकाट
एबीपी माझा वेब टीम | 12 May 2017 08:37 AM (IST)
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडच्या डांगे चौकात एका व्यक्तीच्या डोक्यात दगडाने प्रहार करून हत्या केल्याची घटना आज (शुक्रवार) सकाळी उघडकीस आली. पंडित पेट्रोल पंपच्या मागे हा प्रकार घडला आहे. हत्या झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. तसेच ही हत्या नेमकी कोणी आणि का केली हे देखील समजू शकलेलं नाही. दरम्यान, हत्या मध्यरात्री झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या इसमाच्या डोक्यात दगड आणि विटांनी प्रहार करुन त्याचा निर्घृण खून करण्यात आला आहे. या प्रकारमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. हत्येनंतर आरोपी फरार असून त्याला शोधून काढण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. सध्या वाकड पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.