पुणे: महाराष्ट्रातील विद्यापीठांमधील अर्ध्याहून अधिक पीएच.डी बोगस असल्याचं वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी केलं आहे. त्यामुळं सर्व संशोधन केंद्रांना यापुढे प्रबंध ऑनलाईन जाहीर करण्याच्या सूचना दिल्याचंही तावडे म्हणाले. ते काल पुण्यात भारती विद्यापीठाच्या वर्धापन सोहळ्यात बोलत होते.
‘अनेक जण फक्त पगारवाढ होण्यासाठी किंवा नावापुढे डॉक्टर लावण्यासाठी पीएच.डी. करतात. त्यामुळं विद्यापीठांमधील अर्ध्याहून अधिक पीएच.डीचे प्रबंध हे कॉपी पेस्ट असतात. अशा संशोधन विषयांचा भविष्यात काहीच उपयोग होत नाही.’ असं तावडे म्हणाले..
मोहनदास पै समितीच्या अहवालानुसार आपल्याकडील पीएच.डींपैकी 1.30 टक्केच प्रबंधांचे संदर्भ वापरले जातात असंही तावडेंनी सांगितलं.
त्यामुळे आता सर्व संशोधन केंद्रांना पीएच.डीचे प्रबंध ऑनलाइन जाहीर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरून प्रबंधांची नक्कल करून पदवी मिळवण्याला अटकाव होऊ शकेल.