पुणे : दौंडमध्ये प्रवासादरम्यान महिलेला धक्का लागल्याच्या कारणातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. दौंड तालुक्यातील चौफुलामध्ये आज दुपारी हा प्रकार घडला आहे. योगेश राव असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. आज दुपारी योगेश राव हा तरुण सुप्यावरुन चौफुला येथे एका खाजगी वाहनातून जात होता. त्यावेळी शेजारी बसलेल्या महिलेला त्याचा धक्का लागला. याच कारणावरुन महिलेशी तरुणाची बाचाबाची झाली. मात्र चौफुलाजवळ गाडी येताच दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी गाडी अडवत तरुणाला बेदम मारहाण केली. तसंच शेजारी असलेल्या कॅनॉलमध्ये ढकलून देत त्याची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. बेदम मारहाणीनंतर दुचाकीवरुन आलेले तिघेही फरार झाले आहेत. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तसंच या तीनही आरोपींचा कसून शोध पोलीस घेत आहेत.