मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टोलवसुलीला 2035पर्यंत मंजुरी!
एबीपी माझा वेब टीम | 22 Sep 2016 08:30 AM (IST)
मुंबई: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर छोट्या वाहनांना टोलमुक्ती देण्याची चाचपणी सुरु असतानाच राज्य सरकारने या मार्गावरील टोलवसुलीची मुदत 2035 पर्यंत वाढवली आहे. राज्य सरकारने मुंबई-पुणे एक्सप्रेस वेच्या रुंदीकरणाला परवानगी दिली आहे. त्यामुळे टोल ठेकेदाराची चांदी होणार असून वाहनचालकांना मात्र टोलभार सोसावा लागणार आहे. खालापूर फूडमॉल ते खालापूर इंटरचेंज दरम्यान आठ पदरी उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे. या कामाकरिता ३२१५ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निविदा मागवून हे काम केले जाणार आहे. हा एक्सप्रेस वे सहा पदरी रुंद असला तरी पर्यावरणविषयक मंजुरीअभावी खोपोली ते कुसगावपर्यंत १२ किमीच्या मार्गाचे काम करण्यात आले नव्हते. मात्र वाहतुकीची कोंडी होत असल्याने हे काम हाती घेण्यात आलं आहे.