मनसेच्या एकमेव आमदाराची वेगळी चूल
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 21 Sep 2016 07:11 PM (IST)
पुणे: आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी आता आपली वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 'आपला माणूस, आपली आघाडी' या पक्षाच्या माध्यमातून लढणार असल्याचे जाहीर केलं आहे. विधानसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या बुडत्या नवकेला जुन्नरचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांनी वाचवलं होतं. पण आता त्यांनीही आपली वेगळी चूल मांडली आहे. आगामी नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी "आपला माणूस आपली आघाडी" या पक्षाची स्थापना केली आहे. तसेच सोनवणे नव्या पक्षाच्या नोंदणी करण्याच्या तयारीत आहेत. सध्या सोनवणे मनसेचे सदस्य म्हणून कायम राहणार आहेत. मात्र, पक्षात राहूनच त्यांनी वेगळी चूल मांडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.