मुंबई : डेक्कन क्वीनने प्रवास करणाऱ्या मुंबई-पुण्याच्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. डेक्कन क्वीनचा प्रवास अर्ध्या तासाने कमी होणार आहे. त्यामुळे दररोज ट्रेनने मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या नोकरदारांचा वेळ वाचणार आहे.

डेक्कन क्वीन एक्सप्रेसमध्ये नवीन लिंक होमन-बुश रेक वापरण्यात येणार आहे. यामधील 'पुश अँड पुल' तंत्रज्ञानामुळे दोन्ही शहरांमधील अंतर 30 ते 35 मिनिटांनी कमी होणार आहे. पुढील काही महिन्यात हे नवीन रेक जोडले जाण्याची शक्यता आहे.

सध्या डेक्कन क्वीन पुण्याहून सकाळी 7.15 वाजता निघते आणि मुंबई सीएसएमटीला 10 वाजून 25 मिनिटांनी पोहचते. तर मुंबईहून संध्याकाळी 5.10 वाजता निघणारी डेक्कन पुण्याला रात्री 8.25 ला पोहचते. म्हणजेच सध्या या प्रवासाला साधारण सव्वातीन तासांचा अवधी लागतो.

दररोज डेक्कन क्वीन प्रवास करणाऱ्यांची संख्या एक हजाराच्या घरात आहे. यापैकी बहुसंख्य प्रवासी हे पुण्यात राहून मुंबईत काम करणारे वकील, सरकारी कर्मचारी किंवा तत्सम व्यावसायिक आहेत. त्यांचा दिवसभरातील तासाभराचा वेळ आता वाचू शकेल.

डेक्कन क्वीन ही सीएसएमटी-निझामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसनंतर लिंक होमन-बुश रेक पद्धत वापरणारी मध्य रेल्वेवरील दुसरी ट्रेन ठरणार आहे. पुश अँड पुल टेक्निकमध्ये पुढे आणि मागे असे दोन लोकोमोटीव्ह असतात, यामुळे ट्रेनला स्थैर्य येतं. वळणांवर गती कमी-जास्त करण्यात लागणारा वेळ आणि हिसके यामुळे कमी होतात.

डेक्कन क्वीन

डेक्कन क्वीन ही अनेक प्रवाशांसाठी जणू दुसरं घरच आहे. वर्षभरातील अनेक सण-उत्सव, आनंदाचे सोहळे डेक्कनमध्ये साजरे केले जातात. गेली जवळपास 90 वर्ष डेक्कन क्वीन प्रवाशांच्या दिमतीला आहे.

डेक्कन क्वीनचा इतिहासदेखील मोठा आहे. 1 जून 1930 रोजी डेक्कन क्वीनने आपला पहिला प्रवास सुरु केला. डेक्कन क्वीन ही पहिली सुपरफास्ट डिलक्स ट्रेन म्हणून ओळखली जाते. सुरुवातीला तिला केवळ 7 डबे होते. नंतर ते 12 करण्यात आले आणि आता 17 डबे घेऊन ही गाडी धावते.

या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे ही भारतातील एकमेव अशी गाडी आहे, जिला डायनिंग कार आहे. म्हणजेच चालत्या गाडीत हॉटेल सारखे बसून खण्याची सोय आहे.

पुणे-मुंबई-पुणे असा प्रवास करणारी ही गाडी दोन्ही शाहरांच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. कित्येक वर्षे डेक्कन क्वीनने दररोज पुणे- मुंबई- पुणे प्रवास करणारे प्रवासी आहेत.