पुणे : माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतल्याने माढ्याच्या जागेसाठी खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. या मतदार संघाबाबत उद्यापर्यंत निर्णय घेण्याचा अल्टीमेटम खासदार राजू शेट्टी यांनी आघाडीला दिला आहे.


याबाबत राजू शेट्टी म्हणाले की, "माढा लोकसभा मतदारसंघाची आम्ही सुरुवातीपासून आघाडीकडे मागणी करत होतो. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वतः ही जागा लढवणार होते. त्यामुळे आम्ही ही मागणी मागे घेतली. परंतु शरद पवार आता निवडणूक लढणार नसल्याने पुन्हा आम्ही माढ्याच्या जागेची मागणी आघाडीकडे केली आहे. उद्यापर्यंत आघाडीने त्याबाबत निर्णय घ्यावा."

दरम्यान, काल (सोमवारी)पुण्यात पशूसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये चौथ्या आघाडीबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. शेट्टी-जानकर भेटीमुळे युतीतील नाराज मित्रपक्ष आणि आघाडीत जाऊ न शकलेले पक्ष एकत्र येणार का? याबाबत चर्चा सुरु आहे.