MPSC Students Protest Pune: पुण्यामध्ये एमपीएसीसीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून पुणे शहरात आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. या आंदोलनाला (MPSC Students Protest Pune) आता विरोधी पक्ष नेत्यांनी देखील पाठिंबा दिला आहे, तर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विनंती केली असून आज महत्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. तर या आंदोलनाला आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. 25 तारखेला होणाऱ्या एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. पुण्यातील नवीपेठेतील शास्त्री रोडवर विद्यार्थी आंदोलन (MPSC Students Protest Pune) करत आहेत. आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाल्याने या परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. 


मोठ्या संख्येने विद्यार्थी घटनास्थळी दाखल झाल्यामुळे अलका चौकातून दांडेकर पुलाकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. एलबीएस रोड देखील बंद ठेवण्यात आला आहे. आपल्या मागण्यावरती विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. परिसरातील बॅरिकेड्स काढून विद्यार्थी एकत्र जमा झाले आहेत.(MPSC Students Protest Pune)


MPSC परीक्षा पुढे ढकलली,मात्र विद्यार्थी आंदोलनावर ठाम


 एमपीएससीच्या गुरुवारीच्या बैठकीत 25 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल, असे ट्विट करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ही घोषणा करण्यात आली. मात्र, लोकसेवा आयोगाने पुढे ढकलण्यात आलेल्या परिक्षेत कृषी विभागाच्या २५८ जागांचा देखील समावेश करावा. या २५८ जागांसाठी परिक्षा घेण्याचे नोटीफिकेशन काढावे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय आहे. कृषी विभागाच्या जागांबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे.


भाजप नेते अभिमन्यू पवार यांची प्रतिक्रिया


विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे.एमपीएससीने जी तारीख काढली त्या दिवशी दुसरी परिक्षा आहे का पाहायला हवं होतं. पण, विद्यार्थी करत असलेली मागणी रास्त आहे. मात्र, यामध्ये आता राजकारण होताना दिसत आहे. याआधी देखील विद्यार्थ्यांसाठी परिक्षा पुढे ढकलेली आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.


आमदार रविंद्र धंगेकरांची प्रतिक्रिया


विद्यार्थी त्यांच्या मागण्यासाठी अनेकदा आंदोलने करतात, आयोगातील लोकांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे, राज्य आयोगाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. केंद्राच्या आणि राज्याच्या परिक्षा एकाच वेळी होतात, त्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं धंगेकरांनी म्हटलं आहे.