पिंपरी : पुण्यातील पिंपरीमध्ये रामनगर झोपडपट्टीत एका महिलेनं आपल्या पोटच्या पाच वर्षीय चिमुकल्याला चटके दिले आहेत. एक दिवस घरात नसल्यानं या महिलेनं मुलाला 5 ते 6 ठिकाणी चटके दिले आहेत. या मुलाला उपचारासाठी वायसीएममध्ये दाखल करण्यात आलं आहे.
आई आणि सावत्र वडिल कामावर गेल्यानंतर विराज नावाचा हा चिमुकला घराबाहेर निघून गेला. रात्री सावत्र वडिल किशोर बनसोडे कामावरुन घरी आल्यावर त्याला विराज घरात दिसला नाही. बराच वेळ शोध घेतल्यानंतर त्याला विराज एका ठिकाणी खेळताना दिसला. तेथेच या चिमुकल्याच्या कानाखाली मारुन त्यानं विराजला घरी येण्यास सांगितलं. मात्र विराज घरी आला नाही.
घरी आल्यावर हा प्रकार विराजच्या आईला समजला. तिनं रागाच्या भरात कॅलेंडरची पानं पेटवून विराजच्या पायाला चटके देण्यास सुरुवात केली. या प्रकारानंतर जखमी विराजला वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकारानंतर पोलिसांनी मुलाच्या आईला आणि सावत्र बापाला अटक केली आहे.