पुण्यात मत्सरापोटी काकीकडून पाच वर्षांच्या पुतण्याची हत्या
एबीपी माझा वेब टीम | 24 Mar 2017 08:33 AM (IST)
पुणे : आपल्याला मुलीच आहेत, मात्र धाकट्या जावेला मुलगा असल्याच्या मत्सरापोटी महिलेने पुतण्याचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना पुण्यात समोर आली आहे. पाच वर्षांच्या चिमुकल्याची गळा दाबून हत्या करणाऱ्या महिलेला पोलिसांनी 24 तासात बेड्या ठोकल्या आहेत. 'आपल्याला मुलीच आहेत, मुलगा नाही, मात्र शेजारी राहणाऱ्या धाकट्या जावेला मुलगा आहे. या कारणामुळे सतत टोचून बोललं जायचं.' याच रागातून आरोपी महिलेने पाच वर्षांच्या सख्ख्या पुतण्याची हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. हत्येनंतर घराजवळील पाण्याच्या ड्रममध्ये तिने मृतदेह लपवून ठेवला होता. हडपसर येथील काळेपडळ ससाणेनगर परिसरात गुरुवारी सकाळी माऊली विनोद खांडेकर हा पाच वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला होता. कुटुंबीय आणि नातेवाईकांनी बराच वेळ शोध घेऊनही तो सापडला नाही. अखेर हडपसर पोलिस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस तपासात चिमुरड्याचा त्याच्या सख्ख्या काकूनेच गळा आवळून खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली. काही काळ घरामध्येच खाटेखाली तिने मृतदेह लपवून ठेवला. मात्र घरातील मंडळी आणि पोलीस मुलाच्या शोधात घराबाहेर पडल्याची संधी साधून घरामागील पाण्याच्या ड्रममध्ये तिने मृतदेह टाकला. कोणताही पुरावा नसताना हडपसर पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने 24 तासात महिलेला अटक केली आहे.