पुणे : अवघ्या देशभरात प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील चितळे बंधूच्या मिठाई कारखान्यातील 60 ते 70 कामगारांना कामावरुन काढून टाकलं आहे. पगारवाढीवरुन व्यवस्थापन आणि कामगारांच्या मतभेद झाल्यानंतर, व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे.


चितळेबंधूंच्या गुलटेकडी भागातील कामगार गेल्या काही दिवसांपासून पगारवाढीची मागणी करत आहेत. या मागणीसाठी कामगरांनी संघटना स्थापून कामगार आयुक्तालयात तक्रार दाखल केली आहे.

मात्र, चितळेंकडून कोणीही कामगार आयुक्तांसमोरच्या सुनावणीला हजर राहीलं नाही. त्यानंतर चितळेंकडून कामगारांना काम देण्यासही बंद करण्यात आलं.

अनेक वर्षांपासून काम करत असुनही तुटपुंजा पगार मिळत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.

दरम्यान, कामगारांना कामावरुन कमी केल्यानंतर, चितळे बंधू तात्पुरत्या कामगारांकडून मिठाई बनवून घेत आहेत. त्यामुळे पदार्थांच्या चवीमध्ये आणि दर्जामधे फरक पडल्याच कामगारांच म्हणणं आहे.