पुणे : पुण्याच्या बाणेर भागातील पॉश भागात काही श्वानद्वेषींनी तब्बल 20 कुत्र्यांची हत्या केली आहे. तर चक्क 4 कुत्र्यांना जिवंत जाळण्याचा कर्मदरिद्रीपणा केला आहे. या घटनेनंतर प्राणीप्रेमींमधून संतप्ताची लाट उसळली आहे.

पुण्यातील बाणेरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बांधकामं सुरु आहे. त्यामुळे परिसरही तसा निर्जन आहे. पण तरीही या परिसरात तब्बल 20 कुत्र्यांची हत्या आणि 4 कुत्र्यांना जिवंत जाळल्याच्या घटनेनमुळे प्राणी प्रेमींमधून संतापाची लाट उसळली आहे. ही कुत्री नक्की कुणाच्या जीवावर उठली होती? असा संतप्त सवाल प्राणी प्रेमींमधून उपस्थित केला जात आहे.

सध्या पुणे शहरात कागदोपत्री 40 हजार कुत्र्यांची नोंद आहे. पण खरा आकडा 1 लाखांच्या घरात असल्याचाही अंदाज व्यक्त होत आहे. जानेवारीपासून तब्बल 6 हजार 358 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. मोकाट कुत्र्यांना आवर घालण्याची नितांत गरज आहे. कारण, मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात माणसांनी जीवही गमावले आहे.

पण त्यांची संख्या आवरण्यासाठी निर्बिजिकरणासारखे उपाय आहेत. तसेच चावा जीवघेणा होऊ नये, यासाठी लसीकरणही होऊ शकते. पण त्यासाठी जनावरांपेक्षा क्रूर कृत्य करणे लांछनास्पद असल्याची भावना प्राणी प्रेमींमधून व्यक्त होत आहे.

दरम्यान, या प्रकरणी सामाजिक संघटनांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पण तपासाला अजून सुरुवातही झाली नाही. मात्र, सामाजिक संघटनांना या घटनेतून वेगळाच संशय आहे.