पुणे : पुण्यातील चितळे बंधू मिठाईवालेंच्या मिठाई कारखान्यातील साठ ते सत्तर कामगारांना कामावरुन काढून टाकण्यात आलं आहे. पगारवाढीची मागणी करणाऱ्या कामगारांवर चितळे बंधूंनी ही कारवाई केलीय.
चितळे बंधूंच्या गुलटेकडी भागातील कामगार गेले काही दिवस पगारवाढीची मागणी करत आहेत. मात्र चितळेंचं व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये संघर्ष सुरु आहे.
कामगारांनी कामगार संघटना स्थापन करुन कामागार आयुक्तालयात याबात तक्रार देखील दिली. मात्र चितळेंकडून कोणीही कामगार आयुक्तांसमोरच्या सुनावणीला हजर राहिलं नाही आणि त्यानंतर कामगारांना काम देण्यासही बंद करण्यात आलं.
चितळेंच्या कारखान्यात 10 वर्षे काम करणाऱ्या कामगारांना 9 हजारांहून कमी पगार दिला जातो, तर 36 वर्षे काम करणाऱ्या कामगाराला 15 हजार रुपये दिले जातात, असं कामगारांच म्हणणं आहे.
या कामगारांना कामावरुन कमी केल्यानंतर चितळे तात्पुरत्या कामगारांकडून मिठाई बनवून घेत आहेत. मात्र त्या पदार्थांच्या चवीमधे आणि दर्जामधे फरक पडल्याचं कामगारांचं म्हणणं आहे.