पुणे : निसर्ग चक्रीवादळामुळे थांबलेली मान्सूनची वाटचाल पुन्हा एकदा सुरू झाली आहे. गोवा, दक्षिण कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात आज मान्सूनचे आगमन झाले आहे. आगामी चार ते पाच दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात हा मान्सून पोहचेल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला. पुढील चार दिवस म्हणजे 14 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीत मान्सूनयोग्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोकण आणि गोवा परिसरात पुढील पाच दिवस चांगला पाऊस होईल असा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यात आजपासून हळूहळू पावसाचा जोर वाढेल. 12 जून ते 15 जूनच्या दरम्यान पुणे जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस होईल. तर जिल्ह्यातील घाटमाथ्यावरही पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
भिवंडी, परभणी, हिंगोलीसह काही जिल्ह्यात रात्रभर पाऊस; नदी खळखळली, ओढे-नाले भरले
तळकोकणात पावसाची दमदार हजेरी
तळकोकणात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने जिल्ह्यातील मालवण, कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी तालुक्यात तासभर मुसळधार पाऊस सुरु होता. जिल्ह्यात आतापर्यंत 288 मी.मी. पाऊस झाला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भात शेतीच्या कामाला सुरूवात केली आहे.
बंगालची खाडी सक्रिय
बंगालच्या खाडीत लवकरच एक निम्न दबावाचं क्षेत्र निर्माण होत आहे. सध्या बंगालच्या खाडीचं मध्य-पूर्व आणि त्याजवळच असलेल्या बांगलादेश तसंच म्यानमारच्या किनारपट्टी भागांमध्ये चक्रीवादळाच्या वाऱ्याचं क्षेत्र निर्माण झालं आहे. वातावरणाची परिस्थिती आणि सागरी परिस्थितीमुळे असे संकेत मिळत आहेत की, लवकरच या क्षेत्राचं रुपांतर निम्न दबावच्या क्षेत्रात होईल. अशीच परिस्थिती राहिली तर देशाच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडू शकतो.
जूनमध्ये सामान्यपेक्षा 71% जास्त पाऊस
पूर्वोत्तर भारतात मान्सूनचा वेग काहीसा धीमा आहे. परंतु 3 ते 4 दिवस उशीर हे सामान्यच समजलं जातं. याचदरम्यान पूर्वोत्तर भारताच्या काही भागांसह कोकण, महाराष्ट्र, तेलंगणा तसंच आंध्र प्रदेशच्या उर्वरित भागांमध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थितीत निर्माण झाली आहे. जूनमध्ये देशात मान्सूनचा पाऊस सामान्यपेक्षा 71% अधिक पडला आहे. यात सर्वाधिक योगदान मध्य भारत आणि केरळचं आहे.
Nisarga Cyclone Effect | रत्नागिरीला 'निसर्ग'चा तडाखा, अनेकांचा संसार उघड्यावर