पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आणि त्यांचाच कट्टर, मात्र आता वैरी असलेल्या स्वीकृत नगरसेवकात सध्या चांगलीच जुंपली आहे. या वादात एकमेकांवर विनयभंगाचे गुन्हेही दाखल झाले आहेत.


स्वीकृत नगरसेवकाचे मार्केटयार्ड येथे एक दुकान आहे. त्या दुकानात मोहिते-पाटील बुधवारच्या रात्री आठच्या सुमारास पोहोचले. तिथे उपस्थित पत्नीला तुझा नगरसेवक पती कुठे आहे, त्याने दहा हत्या केल्यात, त्याला सांगा सांभाळून राहा, अशी दमबाजी आणि शिवीगाळ करत नगरसेवक पत्नीच्या हाताला धरून खेचले, तसेच लज्जास्पद स्पर्शही केला, असा आरोप करत मोहित-पाटील यांच्यावर चाकण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारी सायंकाळी सहा वाजता हा गुन्हा दाखल झाला. तर बुधवार आणि गुरुवारच्या मध्यरात्री पावणे दोन वाजता तक्रारदार महिलेचे पती म्हणजेच स्वीकृत नगरसेवकावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला.

गुन्हा दाखल होण्यापूर्वी दोन्ही बाजूकडून जमाव जमला होता. शहरात यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सचिन नरवडे या मोहिते-पाटलांच्या आणि एकेकाळी त्या स्वीकृत नगरसेवकाचा व्यवसायातील जोडीदार याने ही अपहरणाची तक्रार दिली.

नगरसेवकाने त्याच्याच कार्यालयात सचिनला चार दिवस डांबून ठेवल्याचा आरोप केला. तर पंधरा दिवसांपूर्वी देखील याच स्वीकृत नगरसेवकावर एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

घरात घुसून जबरदस्ती केल्याचा या महिलेने तेव्हा आरोप केला होता. ही महिला मोहिते-पाटील गटाचीच असल्याची चर्चा आहे. दिलीप मोहिते पाटील आणि स्वीकृत नगरसेवक यांच्यात ताटातूट झाल्यापासून अशीच चिखलफेक सुरू असल्याची चर्चा चाकणमध्ये सुरु आहे.