पुणे : लोकसभा निवडणूक न लढलेल्या मनसेने विधानसभेच्या मोर्चेबांधणीसाठी तयारी सुरु केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आजपासून राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत.
पुण्यातील अशोकनगरमधील क्लब हाऊसमध्ये राज ठाकरे यांनी पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत मनसे पदाधिकाऱ्यांना मोबाईल घेऊन जाण्यास बंदी करण्यात आली. पदाधिकाऱ्यांचे मोबाईल क्लब हाऊसच्या गेटवरच जमा करुन घेण्यात आले होते. बैठकीमधील माहिती प्रसार माध्यमांना मिळता कामा नये, याबाबतची खबरदारी घेतली जात असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपच्या कारभाराविरोधात राज्यभर रान पेटवणारे राज ठाकरे यांच्या सभांचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला काही फायदा झाला नाही. तर उलट भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आले. या सर्व राजकीय घडामोडी घडत असताना. राज ठाकरे सर्वच जिल्ह्यात बैठका घेणार असल्यानं आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.