पुणे : जातीय नाही, आर्थिक निकषांवर आरक्षण द्या, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. जातीय आरक्षणामुळे समाजात मोठ्या प्रमाणात द्वेष पसरत असल्याचं ते म्हणाले. पुण्यात आयोजित मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते.

विरोधीपक्षात असताना सध्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील गळ्यात कापडी फलक घालून मराठा आरक्षणाची मागणी करत होते. आता सत्तेत येऊन चार वर्ष झाली, मग आरक्षण का दिलं नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. आधीचं सरकार असो वा आत्ताचं, फक्त नागरिकांच्या भावनांशी खेळ होतो आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

जातीय आरक्षणामुळे समाजात मोठ्या प्रमाणात द्वेष पसरत आहे. महाराष्ट्रातल्या तरुण-तरुणींनी हे आरक्षणाचं राजकारण समजून घ्यायला हवं. आरक्षण हे आर्थिक निकषांवरच मिळायला हवं. देशात आरक्षणाचं राजकारण सुरु झालं ते माजी पंतप्रधान व्हीपी सिंग यांच्यामुळे, असं राज ठाकरे म्हणाले.

रोज एकत्र काम करणारे, रोज जेवणाचा डबा एकत्र खाणारे, आज एकमेकांकडे शंकेच्या नजरेने बघू लागले आहेत. भाजपने 2014 च्या विधानसभेला प्रचार मोहीम होती, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, मी आज विचारतो 'भाजपने कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र?' असंही राज ठाकरे उपरोधाने म्हणाले.

काकासाहेब शिंदे यांचा हकनाक बळी

जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे यांचा हकनाक बळी गेल्याची भावनाही राज ठाकरेंनी व्यक्त केली. माझं महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन आहे की कृपया सत्तेत असणारे असो, वा विरोधातले... त्यांच्या राजकारणाला बळी पडू नका. महाराष्ट्रात पुन्हा एखादा काकासाहेब शिंदे होता कामा नये, माझ्या मराठी माणसाचा पुन्हा बळी जायला नको, काळजी घ्या, असं आवाहन राज यांनी केलं.

सरकारी क्षेत्रात संधी नाही, आरक्षणाचा उपयोग काय?

सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण कमी होत चाललं आहे आणि खाजगी क्षेत्रातल्या नोकऱ्या वाढू लागल्या आहेत, असं केंद्रीय मंत्री गेहलोत लोकसभेत म्हणाले होते. जर हे वास्तव केंद्रीय मंत्री मान्य करतात, तर मग आपला लढा कशासाठी आहे नक्की? सरकारी क्षेत्रात संधीच नसेल तर आरक्षणाचा उपयोग काय? असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला.

मराठी मुलांआधी परप्रांतीयांना नोकरी

महाराष्ट्रात आधी मराठी मुला-मुलींची पोटं भरु देत, त्यानंतर परप्रांतीयांची, अशी माझी भूमिका आहे. पण राज्याबाहेरचे तरुण येतात, तुम्हाला थांगपत्ता लागू न देता त्यांना नोकऱ्या दिल्या जातात. महाराष्ट्र उद्योगधंद्यात कायमच अग्रेसर राहिला आहे, पण तरीही या उद्योगधंद्यांमध्ये मराठी मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत, असं का? असंही राज यांनी विचारलं.

पुण्यात अनेक खाजगी शिक्षणसंस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय मुलं शिक्षण घेत आहेत, हे वास्तव आहे पण आपण समजून घेत नाही आहोत, असंही राज ठाकरे म्हणाले. एकमेकांची डोकी फोडून झाली की आपण महाराष्ट्र लुटायला मोकळे, असं म्हणत राज्याबाहेरचे लोक आपल्यावर हसत असल्याचंही राज म्हणाले.

स्वराज्यासाठी प्रत्येक जातीय माणूस लढला

हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत प्रत्येक जातीचा मराठी माणूस एकदिलाने लढला, पण आज काय परिस्थिती आहे आपल्या राज्याची? आज आपण जातीपातींवरुन एकमेकांशी भांडत आहोत. हाच तो महाराजांचा मराठी माणूस का? असा प्रश्नही राज ठाकरेंना उपस्थित करावासा वाटला.

संसदेत मराठी खासदार आवाज उठवतात?

तमिळनाडूमध्ये 'नीट' या वैद्यकीय प्रवेश परीक्षेत तामिळ भाषेतील प्रश्नपत्रिकेत चुका होत्या. तर एक तामिळ खासदार कोर्टात गेला आणि न्यायालयाने निकाल दिला की प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी चार गुण अधिक दिले जावेत. महाराष्ट्रातले खासदार कितीवेळा महाराष्ट्रासाठी उभे राहिले आहेत. लोकसभेमध्ये मराठी किंवा महाराष्ट्राची बाजू मांडणारे खासदार दिसतात का? असा प्रश्नही राज यांनी विचारला.

अहमदाबादमधील एका शाळेत पहिलीपासून गुजराती भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मराठीबाबत असं का होत नाही? इतकी वर्ष महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीयांना मराठी भाषेची सक्ती केली तर काय चुकलं? असंही राज यांनी विचारलं.

केम छो आवडलं नाही

मध्यंतरी गुजराती समाजातील व्यापारी वर्गाने मला संवाद साधण्यासाठी भेटायला बोलावलं होतं. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'केम छो?' म्हणत स्वागत केलं, कदाचित गुजराती समाजाला आनंद झाला असेल पण मला नाही झाला. पण अमेरिकेत एखाद्या मराठी पंतप्रधानाचं स्वागत मराठी भाषेत केलं तरीही मला ते आवडणार नाही, कारण पंतप्रधान हे देशाचे आहेत, त्याआधी कोणत्याही राज्याचे असता कामा नयेत, असं स्पष्ट मतही राज ठाकरेंनी व्यक्त केलं.

राम मंदिर निवडणुकीनंतर

मी खूप आधी बोललो होतो की लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराचा विषय काढतील. निवडणुकीच्या आधी राम मंदिर बांधू, असं परवाच भाजप अध्यक्ष अमित शाह म्हणाले. आत्ता का आठवलं? सत्तेत आल्या आल्या का नाही मंदिर बांधलं?
अयोध्येत राम मंदिर निश्चितच बांधायला हवं, पण निवडणुकीनंतर, असं राज ठाकरे म्हणतात.

अजानची बांग लाऊडस्पीकरवर का?

अजानची बांग देताना लाऊडस्पीकर कशाला हवा? असा प्रश्नही राज ठाकरेंनी विचारला. अजान कोणाला सांगायचं आहे? नमाज घरामध्ये वाचा, रस्ते कशाला अडवता? असं भाष्यही राज यांनी केलं. जैन फतवे कसले काढता? पर्युषण काळात तुम्हाला नसेल खायचं तर नका खाऊ, असंही राज ठाकरे म्हणाले.

मिठीने काय फरक पडला?

देशविदेशात इतक्या जणांना मिठ्या मारतात, राहुल गांधींच्या मिठीने काय फरक पडला? संसदेत काँग्रेस अध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारलेल्या मिठीवरुन राज ठाकरेंनी कोपरखळी लगावली.

पाहा राज ठाकरे यांच्या भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ

https://www.facebook.com/abpmajha/videos/10160878053685271/