पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांची अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) चौकशी सुरू केली आहे. डीएसके यांच्या कंपन्यांमधील करोडो रुपये कुठे आहेत, याबाबत अंमलबजावणी संचलनालयाने त्यांची चौकशी सुरु केली आहे.
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डी एस कुलकर्णी सध्या येरवडा तुरुंगात आहेत. त्यामुळे अंमलबजावणी संचलनालयाचे उपसंचालक अमित भास्कर , उपसंचालक प्रवीण साळुंखे चौकशीसाठी येरवडा तुरुंगात पोहोचले आहेत. डी एस कुलकर्णी यांच्या कंपन्यामधील पैसा नक्की कुठे गायब झाला, कोणत्या खात्यांवर वळवण्यात आला आहे, याबाबत अंमलबजावणी संचलनालयाकडून चौकशी सुरू आहे.
डीएसके यांच्या कंपन्यांमधील जवळपास 900 कोटी रुपये विविध ठिकाणी वळवण्यात आल्याचा संशय अंमलबजावणी संचलनालयाला आहे.
काय आहे प्रकरण?
डीएसकेंवर गुंतवणूकदारांची फसवणूक करत तब्बल 2 हजार 43 कोटींच्या घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी कुलकर्णी दाम्पत्यावर 36 हजार 875 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. डीएसके आणि हेमंती यांना 17 फेब्रुवारीला अटक झाली होती. आधी दोघंही पोलिस कोठडीमधे होते, त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यामुळे दोघांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली.
डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती यांनी केलेल्या पैशांच्या गैरव्यवहारात आणखी तिघांचाही समावेश असल्याचं उघड झालं होतं. डीएसकेंच्या भावाचा जावई केदार वांजपे, त्याची पत्नी (डीएसकेंची पुतणी) सई वांजपे आणि डीएसके कंपनीचा सीईओ धनंजय पाचपोर यांना आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली होती. केदार वांजपे हा डीएसकेंच्या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक होता. ड्रीम सिटीचं अधिग्रहण करण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली होती.