Pune MNS News : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर (PFI) बंदी घातल्यानंतर पुण्यात मनसेने जल्लोष साजरा केला आहे. फटाक्यांची आतषबाजी करुन आणि लाडू वाटून जल्लोष साजरा केला. पुण्यातील अलका चौकात 51 किलो लाडू वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राज ठाकरे यांनी प्रथम पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया विरोधात आवाज उठवल्याने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवर बंदी केंद्र सरकारने घातली, याबद्दल मनसेने केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. त्याच प्रमाणे अशा देश विरोधी प्रवृत्ती कायमच्या ठेचून काढल्या पाहिजे, अशी प्रतिक्रियादेखील त्यांनी दिली आहे.
केंद्र सरकारनं पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि त्याच्याशी संलग्नित असलेल्या आठ संघटनांवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. गृह मंत्रालयानं अनलॉफुल अॅक्टिविटीज प्रिवेन्शन एक्ट (UAPA) अंतर्गत PFI वर ही कारवाई केली आहे. UAPA काद्यांतर्गत केंद्र सरकार एखाद्या संघटनेला बेकायदेशीर किंवा दहशतवादी म्हणून घोषित करू शकतं किंवा त्या संघटनेवर बंदी घालू शकतं. त्यामुळे या संघटनांवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.
काय होतं प्रकरण?
पुण्यात काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयएने पीएफआयच्या कार्यालयांवर छापेमारी केली होती. त्यात पीएफआयच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची परवानगी न घेता आंदोलन केलं होतं. त्यावेळी त्यांनी पाकिस्तान समर्थनार्थ घोषणाबाजी केली होती. या घोषणाबाजी विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाज उठवला होता.
पाकिस्तानचा ध्वज जाळत विरोध
त्यानंतर पुण्यातील मनसैनिक आक्रमक झाले होते. त्यांनी पुण्यातील अलका टॉकीज चौकात मोठं आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनात शेकडो मनसैनिक सहभागी झाले होते. या आंदोलनात मनसैनिकांनी पाकिस्तानचा ध्वज जाळला होता आणि पीएफआय संघटनेवर आणि त्याच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
राज ठाकरेंनी ट्विट करत केला होता विरोध
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल तर पाकिस्तानात चालते व्हा. असली थेरं आमच्या देशात चालणार नाही. माझी केंद्रातील, राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा हिंदुस्थानात दिल्या जाणार असतील तर... आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे, असं ट्वीट राज ठाकरे यांनी केलं होतं.