Pune Crime News : 'एकावर एक थाळी फ्री' देतो सांगत लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे दोन धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आले आहेत. पुण्यातील एका खवय्याला प्रसिद्ध असलेली 400 रुपयांची सुकांता हॉटेलची थाळी 1 लाख 52 हजार रुपयांना तर दुसऱ्याला 3 लाख 34 हजार रुपयांना पडली आहे. 'एकावर एक थाळी फ्री देतो' असं आमिष दाखवत खवय्येगिरीचा फायदा उठवत सायबर चोरांंकडून गंडा घातला गेला आहे. 


पुण्यातील कोरेगाव परिसरात राहणाऱ्या 39 वर्षीय सुशील कुमार खंडेलवाल यांना 1 लाख 52 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. त्यासंदर्भात त्यांनी लगेच कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सुशील कुमार खंडेलवाल इंजिनिअर आहेत. पुण्यातील कंपनीत ते कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नीने ऑनलाईन सुकांता हॉटेलची जाहिरात बघितली. एका थाळीवर एक थाळी फ्री देणार अशी ती जाहिरात होती. त्या जाहिरातीवर फोन नंबर देखील देण्यात आला होता. त्या नंबरवर त्यांच्या पत्नीने फोन केला. त्यानंतर त्यांना झेडओएचओ नावाचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितलं. त्यानुसार त्यांनी ते अॅप डाऊनलोड केलं. 


ऑर्डर करण्यासाठीचे आणि पेमेंट करण्यासाठी लागणारे सर्व डिटेल्स त्यात भरले. क्रेडिट कार्डची माहिती देखील भरली. त्यानंतर काही वेळात त्यांना बॅंक खात्यातून 2 लाख 2 हजार रुपये दुसऱ्याच्या खात्यात जमा झाल्याचा मेसेज आला. हे पैसे आमिष दाखवलेल्या आरोपीच्या खात्यात जमा झाले होते. त्यांनी लगेच पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी बॅंकेशी संपर्क साधला. त्यानुसार बॅंकेने कारवाई करत 50 हजार रुपये परत मिळवले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 


दुसऱ्या घटनेत  4 लाख 86 लाख रुपयांचा गंडा
याच प्रकारची घटना पुन्हा एकदा घडली. पुण्यात आयटी कंपनीत काम करणाऱ्या विनोद आचारी यांचीही सुकांता थाळीच्या नावाने फसवणूक करण्यात आली होती. त्यांच्या बॅंक खात्यातून 4 लाख 86 लाख रुपये आरोपीच्या खात्यात जमा झाले. रक्कम महाराष्ट्रातील कोणत्या बॅंक खात्यात नाहीतर बिहार आणि ओरिसामधील बॅंकेत जमा झाली आहे, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली. 


विनोद यांच्या फेसबुकवर सुकांता थाळीची जाहिरात आली होती. ती जाहिरात पेज व्ह्यू करत असताना त्यांना फोन आला आणि अॅप डाऊनलोड करण्याची माहिती दिली. त्यानुसार त्यांनी प्रोसेस केली आणि पेमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्डचा नंबर टाकला. त्यांच्या खात्यातून लगेच पैसे वजा होण्यास सुरुवात झाली. त्यांना पुन्हा फोन आला आणि काही वेळ थांबा जास्तीचे पैसे वजा होत आहेत, असं सांगितलं. त्यानंतर लगेच त्यांच्या खात्यातून 10 वेळा पैसे वजा झाले. त्यात 4 लाख 86 हजार रुपये आरोपीच्या खात्यात जमा झाले. त्यातील 1 लाख 34 हजार रुपये परत मिळले आहेत. त्यामुळे अशा कोणत्याच जाहिरातींवर विश्वास ठेवू नका, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.