पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पाडवा मेळाव्यातून मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा मनसे कार्यकर्त्यांनी उचचला आहे. राज्यातील बँकांध्ये मराठी बोलली जाते की नाही हे तपासण्याचे आदेश मिळाल्यानंतर  लोणावळ्यातील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेत मनसैनिकांनी हिंदी मराठी भाषेवरून राडा घातला. (MNS) बँकेच्या मॅनेजरने अन कर्मचाऱ्यांनी मराठी ऐवजी हिंदी बोलण्याचा हट्ट धरला.  तुम्ही मराठी का बोलत नाही? असा जाब मनसैनिकांनी विचारला. यावर मॅनेजरने इतकं आक्रमक का होताय? असा प्रतिप्रश्न विचारला. मग संतापलेले मनसैनिक थेट मॅनेजरच्या अंगावर जाऊ लागले, त्यावेळी बँकेतील मराठी कर्मचारी मध्यस्थी करण्यासाठी मध्ये पडला मग मनसैनिकांनी त्याच्या कानशिलात लगावली अन त्याला मॅनेजरच्या कक्षातून बाहेर काढले. आठवड्याभरात बँकेचा कारभार मराठी भाषेत न केल्यास पुन्हा एकदा मानसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आलाय.

नक्की झालं काय?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन गाईडलाईन्सनुसार प्रादेशिक भाषेत व्यवहार करण्याच्या सूचना आहेत. राज्यातील सगळ्या बँकांमध्ये जाऊन बघा मराठी बोलतात का? अशी इशारावजा सूचना आली आणि मनसे कार्यकर्ते पेटून उठलेत. अंबरनाथच्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अमराठी ब्रँच मॅनेजरने मराठी बोलण्यास नकार देत उलट उत्तरं दिल्याने संतापलेल्या मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातल्याची घटना समोर आल्यानंतर आता लोणावळ्यातील बँकेत मॅनेजरने वाद कशाला वाढवता म्हणताच संतापलेल्या मनसैनिकांनी मॅनेजरच्या अंगावर जायला सुरुवात केली. या भागात सगळे मराठी लोक असताना मॅनेजरला तर मराठी यायलाच पाहिजे. बँकेतील सगळे बोर्ड इंग्रजीत आहेत. म्हाताऱ्या माणसांनी वाचायचं कसं? असं म्हणताना एक मराठी कर्मचारी कस्टमरला त्रास होतो म्हणत मध्ये आला. तेंव्हा संतापलेल्या मनसैनिकांनी कर्मचाऱ्याच्या कानशिलात मारत त्याला मॅनेजरच्या केबीनमधून बाहेर काढलं. 

पालघरमधील मनसैनिकही बँकेत

राज ठाकरे यांच्या आदेशनुसार पालघरमधील मनसे कार्यकर्त्यांनी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जात याची पाहणी केली. विशेषतः राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सर्रासपणे हिंदी भाषा बोलली जात असल्याने पालघरसारख्या ग्रामीण भागातील स्थानिक ग्राहकांना अनेक अडचणी येतात. परिणाम कालपासून मनसेकडून बँकांमध्ये भेटी देत यापुढे ग्राहकांशी मराठी भाषेतच बोलण्याची तंबी बँकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात येत आहे. मनसेच्या शिष्टमंडळाकडून बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं असून यापुढे ग्राहकांची इतर भाषेतून साधला जाणारा संवाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सहन केला जाणार नसल्याचा इशारा देखील पालघरमधील मनसेकडून देण्यात आला.

हेही वाचा:

आप पुना जा के बोलो, बँक मॅनेजरचं मनसैनिकांना उत्तर; राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेचा महाराष्ट्र बँकेत मराठीचा आग्रह