पुणे : किरकोळ कारणावरून झालेल्या वादात हडपसर परिसरातील एका 16 वर्षाच्या मुलाचे पाच जणांनी अपहरण करून नग्न करीत त्याला कोयता, बेल्टने मारहाण केली. ही घटना 12 मार्च रोजी मांजरी परिसरात घडली. मारहाण झालेला मुलगा अजूनही बेशुद्धावस्थेत असून ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पीडित मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पाच जणांना अटक केली आहे. विनित सूर्यकांत बिरादार ऊर्फ रेड्डी (19), शुभम राजाभाऊ जाधव (19), देविदास ऊर्फ देवा घनश्याम पाहणे (21), भारत विशाल राठोड(21) आणि समील कलिंदर शेखअशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
मारहाण झालेला मुलगा 12 मार्च रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला जातो असे सांगून बाहेर पडला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. त्याचा शोध घेतल्यानंतरही न सापडल्याने त्याच्या आईने हडपसर पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर हडपसर पोलिसांना एक मुलगा मांजरी रेल्वे ट्रॅकजवळ बेशुद्धावस्थेत पडलेला दिसून आला. पोलिसांनी त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले होते. मुलगा बेशुद्धावस्थेत असल्याने त्याची ओळख पटली नव्हती.
दरम्यान, मारहाण झालेल्या एका मुलाचा व्हिडीओ सोशल मिडियाच्या माध्यमातून पोलिसांच्या हाती लागला. तेव्हा पोलिसांनी हरविलेल्याची तक्रार दिलेल्या मुलाच्या आईवडिलांना हा व्हिडीओ दाखविला. तो पाहून त्यांनी त्यातील मुलगा आमचाच असल्याने सांगितले. त्यानंतर त्यांनी ससून रुग्णालयात जाऊन मुलाला पाहिले. तेव्हाही हा मुलगा बेशुद्ध असल्याचे आढळून आले. या व्हिडीओ अंगावर शहारे आणणारा आहे. या व्हिडीओवरुन पोलिसांना आरोपींची ओळख पटली असून त्यांना अटक केली आहे. हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन नग्न करीत कोयत्याने मारहाण, व्हिडीओ केला व्हायरल
मिकी घई, एबीपी माझा
Updated at:
15 Mar 2020 09:43 PM (IST)
हडपसर पोलिसांना एक मुलगा मांजरी रेल्वे ट्रॅकजवळ बेशुद्धावस्थेत पडलेला दिसून आला. पोलिसांनी त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले होते. मुलगा बेशुद्धावस्थेत असल्याने त्याची ओळख पटली नव्हती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -