पुणे : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील (harshawardhan patil) यांच्या पायाला दुखापत झाली. हर्षवर्धन पाटील यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून याबाबत स्वतः हर्षवर्धन पाटील यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. सध्या हर्षवर्धन पाटील यांची प्रकृती ठीक आहे.


या संदर्भात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलयं की, आज इंदापूर येथे तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांच्या समवेत व्हॉलीबॉल खेळत असताना पाय घसरून पाय फ्रॅक्चर झाला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी पुढील उपचार घेत असून मी आपणा सर्वांच्या सेवेत प्रत्यक्ष उपलब्ध नसलो तरी फोनद्वारे मी आणि माझे कार्यालय आपणास उपलब्ध असेल. आपण काळजी करण्याचे कारण नाही. मी आपणा सर्वांच्या सेवेत लवकरच पुन्हा दाखल होईल.


हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन केलं अन्..


शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा आणि युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे आणि श्री. नारायणदास रामदास हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज इंदापूर जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. नारायणदास रामदास हायस्कुलच्या प्रांगणात तालुकास्तरीय शासकीय आंतरशालेय हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं . या स्पर्धेत 20 संघ सहभागी झाले होते. याच कार्यक्रमात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सर्व संघ आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्या तसेच विध्यार्थी खेळाडू यांच्या समवेत सहभागी होत हॉलीबॉल खेळाचा आनंद लुटला. मात्र याचदरम्यान त्यांना ही दुखापत झाली. 


त्यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले होते की, 'खेळातून पुढे येण्यासाठी या स्पर्धांना महत्व असून या सारख्या स्पर्धेतून राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावा. शिक्षणाबरोबरच खेळाचे महत्व सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी ओळखून आपला पाल्य हा शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असला पाहिजे.यासाठी कुठल्या ना कुठल्या खेळामध्ये विद्यार्थी चमकलाच पाहिजे.


काळजी घ्या...कार्यकर्त्यांचे सल्ले


माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी फेसबुकवर दुखापत झाल्याची पोस्ट टाकल्यानंतर त्यांना अनेक कार्यकर्ते आणि चाहते सल्ले देताना दिसत आहे. 'साहेब आपण लवकर बरे व्हा', काळजी घ्या, अशा प्रकारच्या कमेंट्स करताना दिसत आहे. सोबतच काही कार्यकर्ते सल्लेदेखील देताना दिसत आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Dahihandi Pune : दहीहंडी जल्लोषाला गालबोट; कुठे धारदार शस्त्राने वार तर कुठे हाणामारी...