MIM आमदारावर आरोप करणाऱ्या पुणे शहराध्यक्षांची हकालपट्टी
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 02 Mar 2017 07:49 PM (IST)
पुणे : स्वपक्षाविरोधातील बंडखोरी एमआयएमच्या नेत्याला चांगलीच महागात पडली आहे. एमआयएमचे औरंगाबादेतील आमदार इम्तियाज जलील यांच्यावर आरोप करणारे एमआयएमचे पुणे शहराध्यक्ष जुबेर बाबू शेख यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. जलील यांनी उमेदवारीसाठी पैसे घेतल्याचा आरोप जुबेर यांनी केला होता. शेख यांनी आरोप केल्यानंतर एमआयएमने तात्काळ त्यांची पक्षातून आणि पुणे शहराध्यक्षपदावरुन जुबेर बाबू शेख यांचं निलंबन केलं. आमदाराविरोधात अर्वाच्च भाषेत वक्तव्य आणि पक्षाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांनी बडतर्फीची कारवाई केली. जुबेर बाबु शेख यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्यावर आरोप केले होते. पुण्यात उमेदवारीसाठी जलील यांनी पैसे घेतल्याचा शेख यांचा आरोप होता. इम्तियाज जलील यांनी एमआयएमचं पुण्यातील वातावरण दुषित करण्याचं काम केल्याचा आरोपही शेख यांनी केला होता. औरंगाबादच्या काही नगरसेवकांनी पुण्यात येऊन भाजपच्या नगरसेवकाकडून पैसे घेतल्याचं शेख यांनी म्हटलं होतं.