मावळ, पुणे : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठीची (Lok Sabha election 2024) 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र भाजपचे मित्रपक्ष असलेले शिवसेना आणि अजित पवार गटाने त्यांच्या उमेदवारीची यादी अजून जाहीर केली नाही आहे. त्यात राज्यात काही मतदारसंघात रस्सीखेच सुरु आहे. अजित पवार गट उमेदवारांची चाचपणी करत आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारांची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजताच यादी जाहीर होईल. त्यामुळं माझी धाकधूक वाढण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असा दावा  मावळचे (Maval Loksabha) खासदार श्रीरंग बारणेंनी  (Shrirang Barne) केलाय. मी यावेळचा खासदार ही शिवसेनेचाचं असेन, असं ठामपणे सांगत भाजप प्रवेशाच्या चर्चांना बारणेंनी पूर्ण विराम दिला. 


श्रीरंग बारणे नेमकं काय म्हणाले?


गेले अनेक वर्ष या मतदारसंघांमध्ये मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो. लोकांमध्ये राहून काम करतोय. त्यामुळे यात धोका वाढणं किंवा पुढच्या कालावधीमध्ये जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाला सामोरे जाणं माझं काम आहे. महायुतीचा उमेदवार म्हणून मी पुढे जाईन ,असं श्रीरंग बारणेंनी स्पष्ट केलं आहे. 


गैरसमज कुणी पसरवण्याचं कार्य करू नये!



ते पुढे बोलताना म्हणाले की, 2009 ला मी विधानसभा शिवसेनेचा उमेदवार म्हणून त्या निवडणुकीला सामोरे गेलो. 2014, 2019 ला देखील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय या महायुतीचा उमेदवार म्हणून त्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवली आणि ती यशस्वीपणे विजयदेखील संपादन केलेला आहे. त्यामुळे याही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय महायुतीचे घटक पक्षाच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जाणारे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते तो निर्णय घेतील त्यामुळे गैरसमज कुणी पसरवण्याचं कार्य करू नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे. त्यासोबतच येणाऱ्या निवडणुकीमध्ये मावळ मतदारसंघांमधून महायुतीचा उमेदवार म्हणून श्रीरंग बारणे असेल, असा दावा त्यांनी केला आहे. 


कमळावर लढणार की धनुष्यबाणावर? 


कमळावर लढणार की धनुष्यबाणावर? असं विचारल्यावर 'मी महायुतीचा उमेदवार असेल' असं म्हणत बारणेंनी संदिग्धता कायम ठेवली होती. बारणेंच्या उमेदवारीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आणि भाजपने ही विरोध दर्शविला होता. पिंपरी भाजपने कमळावरचा उमेदवार असायला हवा, मग बारणे असले तरी आमची हरकत नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यालाच अनुषंगाने बारणे भाजपचे उमेदवार असतील, अशी चर्चा मावळ लोकसभेत सुरू होती. अशातच मी महायुतीचा उमेदवार असेन, असं म्हणत बारणेंनी आणखी संदिग्धता वाढवली होती.