पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे (Vasant More)   यांनी गुरुवारी आपल्या भविष्यातील राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट केली. वसंत मोरे हे गुरुवारी पुण्यातील शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या कार्यालयात पोहोचले. याठिकाणी ते शरद पवार यांच्या भेटीसाठी आल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते. त्याचवेळी शरद पवार गटाच्या कार्यालयात अजितदादा गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हेदेखील उपस्थित होते. कालपासून निलेश लंके हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. निलेश लंके शरद पवार गटाच्या कार्यालयात अमोल कोल्हे यांना भेटण्यासाठी आले होते. यादरम्यान निलेश लंके आणि वसंत मोरे यांनी काहीवेळ शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. 


आपण आपला निर्णय घेण्यासाठी आणखी काही वेळ घेऊ, असे वसंत मोरे यांनी म्हटले.  त्यामुळे ते शरद पवार गटात प्रवेश करणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. वसंत मोरे यांना पुणे लोकसभेची निवडणूक लढवायची आहे. पण महाविकास आघाडीत पुण्याची जागा काँग्रेसच्य  वाट्याला आहे. त्यामुळे आता वसंत मोरे हे शरद पवार यांच्याशी चर्चा करुन काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


वसंत मोरेंनी शरद पवारांची भेट घेतली त्यावेळी खासदार अमोल कोल्हेदेखील उपस्थित होते. लोकसभेच्या निवडणुकीत अमोल कोल्हेंना पाठिंबा देणार की तुम्ही इच्छूक आहात, असं विचारल्यानंतर मी त्यांच्या मतदार संघात राहायला आहे. अमोल कोल्हे आणि माझी जुनी मैत्री आहे. माझा असा कोणताही विचार नाही. मी अजून कोणताही निर्णय घेतला नाही. फक्त शरद पवारांना भेटायला आल्याचं वसंत मोरेंनी स्पष्ट केलं आहे. 


निलेश लंके हे आज शरद पवार गटात प्रवेश करणार?


निलेश लंके हे आज शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयात शरद पवार,  जयंत पाटील आणि निलेश लंके यांची पत्रकार परिषद होणार आहे. मात्र यापूर्वी अजित पवारांनी निलेश लंकेंना सज्जड दम दिल्याचं पाहायला मिळालं.  निलेश लंकेंनी चुकीची भूमिका घेऊ नये, घेतलीच तर त्यांचा आमदारकी जाणार असा सज्जड दमच अजित पवारांनी दिला. शरद पवारांसोबत जायचं असेल तर लंकेंना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल असंही ते म्हणाले. त्यानंतर आता थेट निलेश लंके शरद पवारांच्या भेटीला पोहचले आहे. काही वेळात ते पक्षप्रवेश घेण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाची बातमी-