पुणे: मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वेक्षणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम यांची आयोगातून हकालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप शुक्रे यांच्यापेक्षा वेगळी भूमिका घेतल्याने मेश्राम यांना आयोगातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे समजते. त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाकडून राज्यभरात करण्यात आलेल्या मराठा समाजाच्या सर्वेक्षणानंतर अहवाल सादर करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. अशावेळी चंद्रलाल मेश्राम यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र, याबाबत आपल्याला अद्याप कोणताही अधिकृत आदेश मिळाला नसल्याचे मेश्राम यांनी सांगितले.
राज्य मागासवर्ग आयोगाच्या माजी सदस्यांचे तडकाफडकी राजीनामे
यापूर्वीचे राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांच्यासह अनेक सदस्यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. आयोगाच्या कामात सरकारमधील दोन मंत्री हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करत माजी अध्यक्ष निरगुडे यांनी आयोगाचा राजीनामा दिला होता. तत्पूर्वी राज्य मागासवर्ग आयोगातील बबनराव तायवाडे, संजय सोनावणे, लक्ष्मण हाके, बी एल किल्लारीकर या सदस्यांनीही सरकारी हस्तक्षेपाचे कारण देत राजीनामे दिले होते. यानंतर राज्य सरकारने माजी न्यायमूर्ती संदीप शुक्रे यांची राज्य मागासवर्ग आयोगाचे म्हणून नियुक्ती केली होती.
चंद्रलाल मेश्राम काय म्हणाले?
चंद्रलाल मेश्राम यांनी यासंदर्भात 'एबीपी माझा'शी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, मला अद्याप राज्य मागासवर्ग आयोगातून काढून टाकल्याच्या आदेशाची कोणतीही प्रत मिळालेली नाही. ही प्रत मिळाल्यानंतर मी पुढची भूमिका ठरवेन. मला आतापर्यंत काहीही कळालेले नाही. मी यासंदर्भात मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष संदीप शुक्रे यांची भेट घेईन. राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य म्हणून आयोगाचा सदस्य म्हणून मी आतापर्यंतची सगळी जबाबदारी पार पाडली आहे. मध्यंतरी मला एक नोटीस आली होती. मी बैठकांना गैरहजर राहत असल्याचे नोटीसमध्ये म्हटले होते. मी त्या नोटीसला उत्तर देताना मी बैठकांना कितीवेळा हजर होतो, याच्या नोंदी पाठवल्या. मराठा सर्वेक्षणानंतर माझी जी काही भूमिका असेल ती मी अहवालात मांडेन, असेही चंद्रलाल मेश्राम यांनी स्पष्ट केले.
आणखी वाचा
मराठा आरक्षण निर्णयानंतर आता एकनाथ शिंदेच स्ट्राँग मराठा लीडर, इतर लीडरशीप बाद: प्रकाश आंबेडकर