पुणे : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सरकारकडून मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना देण्यात येणारं टाईम बॉन्ड 18 दिवसानंतर देखील मिळाले. त्यामुळे, लेखी टाईम बॉन्ड (Time Bond) देण्यासाठी येणाऱ्या शिष्टमंडळाकडून मनोज जरांगे यांना फक्त तारीख पे तारीख दिली जात असल्याचे चित्र आहे. अशात आता टाईम बॉन्डवरून जरांगे आक्रमक होण्याची शक्यता आहे. आपण आजचं सरकारमधील काही मंत्र्यांना थेट फोन करून याबाबत जाब विचारणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. तर, टाईम बॉन्ड देणार की नाही याबाबत आज सरकारला शेवटचं विचारणार असल्याचे जरांगे म्हणाले. त्यामुळे टाईम बॉन्डवरून सरकार आणि जरांगे पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. 


दोन दिवसांत टाईम बॉन्ड देण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारकडून 18 दिवस उलटूनही टाईम बॉन्ड दिले जात नसल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना जरांगे म्हणाले की, “टाईम बॉन्डची वाट पाहून आता मी परेशान झालो आहे. आज मी बच्चू कडू यांना बोलणार आहे. तसेच मंत्री संदीपान भुमरे, मंत्री उदय सामंत यांना देखील बोलणार आहे. आज 18 दिवस झाले. आज त्यांना बोलणारच आहे. काल देखील त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, पण बोलणे झाले नाही. मात्र, आज यावर त्यांना बोलणार आहे. देणार की नाही आज शेवटचं बोलणार असल्याचे जरांगे म्हणाले. 


अन्यथा तुम्ही उघडे पडताल...


सरकारच्या शिष्टमंडळाकडून टाईम बॉन्ड देण्याबाबत आतापर्यंत मनोज जरांगे यांना अनेक तारखा देण्यात आल्या, मात्र प्रत्यक्षात टाईम बॉन्ड अजूनही देण्यात आला नाही. त्यामुळे यावरून आता जरांगे यांनी संताप व्यक्त केला आहे. "टाईम बॉन्ड देण्याचा शब्द ठरला होता, याबाबत पत्रकार परिषेदत माहिती देण्यात आली होती. त्यामुळे काही अडचण नाही, मात्र तुम्ही समाजाच्या पुढे उघडे पडणार," असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे. 


मराठा समाजाचा उत्साह वाढला


समाज एकत्र येत आहे, त्यामुळे आपल्या लेकरांचे भलं होऊ नये असे कुणालाही वाटणार नाही. समाजाला आरक्षण मिळत असल्याने मराठा समाजाचा उत्साह वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा लाखोच्या संख्येने एकत्र येत आहे. आम्ही आंदोलक आहोत, त्यामुळे कोणीही भेटायला आला तरी आम्ही त्यांना धन्यवाद म्हणत आहोत, असेही जरांगे म्हणाले. तसेच मराठा समाज ओबीसीत असल्याच्या नोंदी सापडत आहे. सर्व नोंदी सापडत असून, देखील तुम्ही आरक्षण देत नसाल तर ही भूमिका चुकीची असल्याचे देखील जरांगे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Manoj Jarange: छगन भुजबळांना आता माझा व्यक्ती म्हणूनही विरोध असेल, मनोज जरांगेंचा हल्लाबोल