पिंपरी-चिंचवड : 'नाम फाऊंडेशन'च्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांसाठी झटणारे अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आता हुंडाप्रथेविरोधात मोर्चा उघडला आहे. हुंडा घेणारा नामर्द असतो, असा टोला अनासपुरेंनी हाणला.
दुष्काळग्रस्त तरुणींचे संसार थाटण्यास हातभार लावणारे अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी हुंडा घेणाऱ्यांवर आगपाखड केली. हुंडा घेणाऱ्यांना वेळीच रोखा असं आवाहन करताना त्यांनी हुंडा घेणाऱ्यांना नामर्दाची उपमा देत त्यांनी खडे बोल सुनावले. पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या मराठवाडा मुक्तीदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.


मराठवाड्यातल्या राजकारण्यांनी वायफळ भांडण्यापेक्षा पाण्यासाठी भांडावं, लोकांच्या संयमाचा फायदा घेऊ नये, असा सल्ला मकरंद अनासपुरे यांनी दिला होता. 'वर्षभर रिकामं राजकारण करण्यापेक्षा मराठवाड्यातील नेत्यांनी पाण्यासाठी भांडावं. आम्ही सहनशील आहोत, याचा फायदा घेऊ नये' असा सल्ला वजा इशारा अनासपुरे यांनी दिला.