पुण्यातील टिळक चौकामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत इतर ढोल-ताशा पथकांप्रमाणे नादब्रह्म पथकाचाही ताल सुरु होता आणि त्याच्या ठेक्यावर तरुणाई थिरकत होती. मात्र गर्दीमधील एकाला त्रास होऊ लागल्याने त्याला घेऊन जात असलेल्या अॅम्ब्युलन्सला हजारो पुणेकरांनी रस्ता करुन दिला.
अॅम्ब्युलन्सला वाट करुन देण्याचं आवाहन पोलिस करत होते. मात्र पोलिसांकडे गर्दीचं लक्षच नव्हतं. महापौरांनीही चार ते पाच वेळा अॅम्ब्युलन्सला जाण्यासाठी वाट मोकळी करुन देण्यास सांगितलं. त्यानंतर नादब्रह्म पथकाने वादन थांबवलं. कार्यकर्ते, स्वयंसेवक, पोलिसांच्या मदतीने हजारोंची गर्दी दोन भागात विभागली. काही वेळात मधल्या रस्त्यातून अॅम्ब्युलन्स कोणत्याही अडथळ्याविना निघून गेली. यानंतर पुन्हा मिरवणुकीला त्याच जल्लोषात सुरुवात होते.
एका इमारतीच्या छतावरुन हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीचं शूटिंग करत असताना ही दृश्ये कॅमेऱ्यात कैद झाली. गडबड गोंधळ, ढकलाढकली, चेंगराचेंगरी न होता ही अॅम्ब्युलन्स रुग्णालयाकडे निघून गेली.
टू ब्रदर्स प्रॉडक्शनने यू ट्यूबवर शेअर केलेला या व्हिडीओ तब्बल 1 लाख 15 हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओची पुणेकरांमध्ये जोरदार चर्चा आहे.
पाहा व्हिडीओ