पुणे :  पुण्यातील बाबा भिडे पूल पाडला जाणार आहे. महापालिकेच्या वतीने  मूळा मुठा नदी सुधार प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत डेक्कन परिसरातील बाबा भिडे पूल पाडून नवीन उंचीचा पूल बांधण्यात येणार आहे. यासोबतच नदीपात्रातील रस्ता बंद करून मुळा-मुठा नदीचा अहमदाबादच्या साबरमती नदीच्या धर्तीवर विकास करण्याचीही योजना आहे. या संपूर्ण प्रकल्पाला 4 हजार 727 कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचंही कळतंय.


पुणे महापालिकेकडून मुठा नदीच्या सुशोभीकरणाच्या प्रकल्पाला या महिनाअखेरपर्यंत सुरवात होणार आहे. हा प्रकल्प हाती घेताना नदीच्या दोन्ही बाजूने पर्यावरणपूरक कामे केली जाणार आहेत.  या अंतर्गत डेक्कन परिसरात असणारा बाबा भिडे पूल हा लहान असल्याने तो पाडला जाणार आहे. तर टिळक पुलापासून ते म्हात्रेपूला दरम्यान रस्ता नदीचे पात्र मोठे करणे, सुशोभीकरण करणे यासाठी या भागात सध्या असलेला रस्ता बंद केला जाणार आहे. ही वाहतूक इतर मार्गांनी वळवली जाईल. तसेच नवे रस्ते तयार केले जातील, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.


पुणे महापालिकेतर्फे पावणे पाच हजार कोटी रुपये खर्च करून मुळा मुठा नदीचा काठ सुशोभित केला जाणार आहे. या प्रकल्पाचे महापालिकेतर्फे सादरीकरण करण्यात आले. दरम्यान नदीपात्रातील रस्ते बंद झाले तर नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. मात्र या कामाच्या पहिल्या दोन्ही टप्प्यात नदीपात्रातील रस्ते बंद होणार नाहीत. भिडे पूल किंवा नदी पात्रातील रस्ते याचं काम कमीत कमी दोम वर्षांनंतर सुरु होईल त्यामुळे नागरिकांनी आता काळजी करण्याचे कारण नाही असंही पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha