पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे उपचारादरम्यान निधन झाले. ते 78 वर्षाचे होते. उद्या सकाळी 11 वाजता निगडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बाबर पोटाच्या विकाराने त्रस्त होते.  पोटावरील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या आठवड्यात त्यांच्या तब्येतीत सुधारणा देखील झाली होती. त्यामुळेच 26 जानेवारीला ते त्यांच्या बँकेत ध्वजारोहणासाठी हजर होते. पण त्यानंतर पुन्हा अपचनामुळं त्रास होऊ लागला. म्हणून त्यांना चिंचवडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी मात्र तब्येत खालावल्याने पुढच्या उपचारासाठी बाणेरच्या खाजगी रुग्णालयात भरती करण्या आलं होतं. पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. बाबर यांची 1997मध्ये बायपास सर्जरी झाली होती, 1999मध्ये गुडघ्याची शस्त्रक्रिया तर 2014 मध्ये मणक्याची शस्त्रक्रिया ही झाली होती. यातून ते जोमाने उभे राहिले. पण पोटाच्या विकाराने मात्र त्यांना अधिकच असह्य केलं अन यातच त्यांचं निधन झालं.


गजानन बाबर यांचा प्रवास 


पिंपरी चिंचवडमध्ये 1974 साली गजानन बाबर यांनी शिवसेनेच्या पहिल्या शाखेची स्थापना केली होती. दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते या शाखेचं उद्घाटन झालं आणि बाबर शहरात सक्रिय झाले. महापालिकेत तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले, एकदा विरोधी पक्षनेते पद ही भूषवलं. 1995 आणि 1999ला हवेली विधानसभेतून ते आमदार झाले . 2004च्या विधानसभेत पराभूत झाले शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख पद  देखील भूषवले. 


2009च्या लोकसभेत मात्र नवनिर्मित मावळ लोकसभेतून पहिले खासदार म्हणून निवडून आले. साताऱ्यातील किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे अनेक वर्षांपासून ते संचालक होते. तर विद्यमान उपाध्यक्ष पद त्यांच्याकडेच होतं. 2014च्या लोकसभेला तिकीट नाकारल्यापासून ते राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. नाराजीतून त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आणि कालांतराने स्वगृही परतले. शहराचे संपर्क प्रमुख सचिन अहिरांनी त्यांची नुकतीच भेट घेतली, त्यानंतर ते राजकारणात सक्रिय होऊ लागले होते.


इतर महत्त्वाच्या बातम्या: