पुणे- जामीनावर बाहेर आलेल्या समृद्ध जीवन समुहाच्या महेश मोतेवारने पुन्हा गुंतवणूकदारांकडून ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून पैसे गोळा करायला सुरुवात केली आहे. महेश मोतेवार त्यासाठी घेत असलेल्या ऑनलाईन बैठकांचा व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती लागला आहे. फसवणूकीचा धंदा नव्याने करण्यासाठी महेश मोतेवारने दौलत प्राईड या नावाने कंपनी स्थापन केली आहे. आधीच्या समृद्ध जीवन कंपनीत ज्यांचे पैसे अडकलेत अशा लाखो गुंतवणूकदारांना दहा वर्षांनंतर एक पैसाही परत मिळालेला नाही. आता या गुंतवणूकदारांना पैसे परत हवे असतील तर दौलत प्राईड या कंपनीत गुंतवणूक करायला सांगितलं जातंय. तर दुसरीकडं मोतेवारच्या मालमत्ता जप्त करण्याऐवजी त्या हडप करण्याचा उद्योग सरकारी अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप गुंतवणूकदार करत आहेत. प्रशांत कोरटकरकडे असलेली रोल्स रॉयस कार अशाचप्रकारे हडप करण्यात आल्याचं या गुंतवणूकदारांचं म्हणणं आहे.
व्हिडीओ कॉन्फरंसनिंगच्याद्वारे गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करणारी हा आहे महेश मोतेवार. समृद्ध जीवन घोटाळ्यात नऊ वर्षं तुरुंगात राहून मोतेवार दीड वर्षांपूर्वी जामिनावर बाहेर आला आहे. मात्र, बाहेर आल्यावर मोतेवारने भुजंग देशमुख आणि संदीप पाटील या दोन साथीदारांच्या नावे दौलत प्राईड या नावाने कंपनी स्थापन केलीय. या कंपनीत लोकांनी पैसे गुंतवावेत यासाठी मोतेवार दरररोज व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे देशभरातील लोकांना पुन्हा जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतोय. ज्यांचे पैसे मोतेवारकडे अडकलेत त्यांना पैसे हवे असतील तर दौलत प्राईड या नव्या कंपनीचे सदस्य व्हायला सांगण्यात आलं आहे. त्यासाठी प्रत्येकाकडून अकराशे रुपये आकारण्यात येत आहेत.
महेश मोतेवारला 2015 साली अटक करण्यात आली होती. देशभरातील बावीस लाख गुंतवणूकदारांची चार हजार सातशे कोटी रुपयांना फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप होता. या प्रकरणाचा तपास सीआयडी, सीबीआय, आणि ईडी अशा वेगवगेळ्या तपास यंत्रणांनी केला. या तपासात धक्कादायक माहिती समोर आली.
* महेश मोतेवार आणि त्याच्या नातेवाईकांच्या नावे देशभरात 265 स्थावर मालमत्ता आहेत.
* मोतेवार आणि नातेवाइकांच्या नावे तब्बल 985 बॅंक खाती आहेत.
* मोतेवार आणि नातेवाइकांच्या नावे 86 वेगवेगळी वाहनं आहेत ज्यामधे प्रशांत कोरटकरकडील रोल्स रॉईस कारचाही समावेश आहे.
* मोतेवारच्या या सगळ्या मालमत्तांची रक्कम चार हजार सातशे कोटी रुपये इतकी आहे.
* या मालमत्तांचा लीलाव होउन मोतेवारकडे पैसे गुंतवणार्या बावीस लाख गुंतवणूकदारांना पैसे परत मीळणे अपेक्षीत होते.
* 2015 मधे मोतेवारला अटक करण्यात आल्यानंतर मोतेवारच्या मालमत्तांची यादी करुन त्यांचा लीलाव करण्यासाठी सक्षम अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली.
* मात्र आतापर्यंत मोतेवारकडे पैसे गुंतवलेल्या एकाही गुंतवणूकदाराला एक पैसाही परत मीळालेला नाही.
* दुसरीकडे मोतेवारच्या मालमत्ता प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरुन हडप केल्या जात असल्याचा गुंतवणुकदारांचा आरोप आहे.
* प्रशांत कोरटकरकडे असलेली रोल्स रॉईस गाडी ही अशीच हडप करण्यात आल्याचा गुंतवणूकदारांचा आरोप आहे.
कोरटकरकडे असलेल्या गाडीचं रोल्स रॉईस गाडीचं कनेक्शन समोर!
प्रशांत कोरटकरकडे असलेली आलिशान रोल्स रॉयस सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीनेच हडप करण्यात आल्याचा गुंतवणूकदारांचा आरोप आहे. सात ते आठ कोटी किमतीची ही गाडी सीआयडीने जप्तच केली नाही. तर सीबीआयने केवळ ही गाडी विकता येणार नाही अशी नोटीस वाजवली. मात्र तरीही ही गाडी सरकारी अधिकाऱ्यांनी प्रशांत कोरटकरला कशी दिली असा सवाल गुंतवणूकदार विचारतायत.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य आणि इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचा आरोप असलेला कोरटकर रोल्स रॉयस कार सह फरार झालाय. त्याच्याकडे असलेली रोल्स रॉयस कार आता आम्ही जप्त करू असं सीआयडीचे अधिकारी म्हणतायत. परंतु प्रश्न फक्त एका रोल्स रॉयस कारचा नाही तर मोतेवारच्या चार हजार कोटी सातशे कोटी रुपयांच्या मालमत्तांचा आहे. या मालमत्तांचं पुढं काय झालं आणि त्या विकून अद्याप एकही रुपया गुंतवणूकदारांना का मिळालेला नाही या प्रश्नांची उत्तरं गुंतवणूकदारांना हवी आहेत.
महेश मोतेवारने एक घोटाळा केला. पण त्याने केलेल्या घोटाळ्याचा तपास करताना त्याहून अधिक मोठा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय. तपास करून सामान्यांचे पैसे परत देण्याची जबादारी असलेले सरकारी अधिकारीच या नव्या घोटाळ्याच्या मुळाशी असल्याचं गुंतवणूकदार म्हणतायत. कुंपणाने शेत खाण्याचा हा प्रकार आहे. प्रशांत कोरटकर आणि त्याच्याकडे असलेली रोल्स रॉयस हे तर केवळ एक उदाहरण आहे. मोतेवारच्या मालमत्तांच पुढं काय झालं याच उत्तर शोधायचा प्रयत्न केल्यास अशा अनेक सुरस कहाण्या समोर येणार आहेत.