Ajit Pawar On Prutviraj Chavhan :  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी आमदार म्हणून काम केलं नव्हतं. मागच्या काही वर्षांमध्ये आम्ही लोक काम करत असताना आम्हाला आमच्या विरोधकांनी तसेच विरोधात असताना सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी कसं वागणूक दिली ती त्यांनी बघितले नव्हते. त्यांना आमदारकीचा अजिबात अनुभव नव्हता. इथल्या मंत्रिमंडळाचा अजिबात अनुभव नव्हता. ते दिल्ली पीएम ऑफिसमध्ये किंवा त्यांच्या विभागाचं कामकाज ते बघायचे आणि निश्चितपणे दिल्लीचं राजकारण आणि राज्याचा राजकारणामध्ये खूप अंतर आहे. दुर्दैवाने त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना काही असे प्रसंग आमच्या समोर निर्माण झाले की आम्ही एकमेकाला साथ द्यायच्या ऐवजी त्यावेळेसच्या काहींना आमचे विरोधक जवळचे वाटले, त्याचा फटका नंतर सरकार पडायला बसला, असं वक्तव्य  विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं आहे. ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.


अजित पवार पुढे म्हणाले की, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज यांना आमदारकीचा अजिबात अनुभव नव्हता. मंत्रीमंडळाचा देखील अनुभव नव्हता. दिल्लीत पंतप्रधानांच्या एका विभागाच्या कार्यालयाचं कामकाज ते बघत होते. दिल्लीच्या राजकारणात आणि राज्याच्या राजकारणात भरपूर फरक आहे. दुर्दैवाने कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र असताना काही असे प्रसंग आमच्या समोर निर्माण झाले की, आम्ही एकमेकांना साथ देण्याऐवजी त्यावेळेच्या काहींना आमचे विरोधक जास्त जवळचे वाटले आणि आम्ही राष्ट्रवादीवाले जरा लांबचे वाटलो. त्याचाच फटका नंतर सरकार पडायला झाला, असंही मत पवार यांनी म्हटलं.


विलासराव देशमुख दिलदार माणूस 


मी अनेक मुख्यमंत्र्यांसोबत काम केलं आहे. मी आमदार असताना मुख्यमंत्री म्हणून काम करताना शरद पवार यांच्या कामाचा ठसा मनात उमटला गेला. त्याचं काम देखील मोठं आहे. त्याचबरोबर बाकी मुख्यमंत्र्यांच्या कामाची पद्धत चांगलीच होती. मात्र मला विलासराव देशमुख यांच्या कामाची पद्धत जास्त आवडत होती. विलासराव देशमुख दिलदार माणूस होते, असं अजित पवार म्हणाले. 


शिवसेनेतील बंडाबाबत उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं...


उद्धव ठाकरेंना बंडाची कल्पना देऊनही त्यांनी गांभीर्याने घेतलं नाही, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे. ते म्हणाले की, बंड होणार आहे हे लक्षात आलं होतं. त्यासंदर्भातील माहिती आम्ही आणि शरद पवार यांंनी उद्धव ठाकरेंना दिली होती. त्यानंतर काही बैठकादेखील झाल्या. मात्र उद्धव ठाकरे हे सगळं मानायला तयार नव्हते.माझा माझ्या आमदारांवर विश्वास आहे. ते अशी भूमिका घेणार नाहीत, असा विश्वास उद्धव ठाकरेंना होता. मात्र पहिल्यांदा 15 ते 18 आमदारांचा ग्रुप गेला त्यातूनही ज्या प्रकारे बाकी आमदारांना एकजुटीने ठेवण्याची गरज होती. तशी गरज दाखवली गेली नाही. त्यावेळी ज्यांना थांबायचं आहे ते थांबा आणि ज्यांना जायचं आहे ते जा, असं वातावरण निर्माण झालं होतं. ते सगळं चित्र सगळ्यांना बघायला मिळालं. उद्धव ठाकरेंनी या आमदारांवर विश्वास टाकला होता. त्या आमदारांनी त्यांच्या विश्वासाला तडा देण्याचं काम हे केलं, असंही ते म्हणाले.