पुणे : लोकसभेच्या तयारीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) मैदानात उतरले आहेत. पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी शरद पवार कार्यकर्ता मेळावे घेत आहेत. आज लोणावळ्यात (Lonavala)शरद पवारांनी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात अजित पवार गटातील अनेक कार्यकर्ते शरद पवार गटात परतले आहे. यात मेळाव्यात बोलताना शरद पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. 'भाजप म्हणजे वॉशिंग मशीन, आरोप करा आणि पक्षात प्रवेश देऊन धुवून काढा, भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. त्यासोबतच विविध मुद्यांवर त्यांनी भाष्य केलं आहे.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
भाजपवर वॉशिंग मशीनचा आरोप करत शरद पवार म्हणाले की, मुंबईत आदर्श सोसायटीमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा हात आहे, असा आरोप भाजपने केला. सातव्या दिवशी ते भाजपमध्ये गेले आणि पंधराव्या दिवशी ते भाजपचे खासदार झाले. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भ्रष्टवादी पक्ष म्हणाले. मोदींनी राज्य सहकारी बँक आणि जलसंपदा विभागात घोटाळा केला, असा आरोप मोदींनी केल्यावर मी म्हणालो हिंमत असेल तर चौकशी करा. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ दे, पण मोदींनी चौकशी करावी. मात्र घडलं काय, ज्यांच्यावर आरोप केले आज ते भाजपमध्ये आहेत. त्यामुळं भाजप म्हणजे वॉशिंग मशीन झालेली आहे. आरोप करा आणि त्यांना पक्ष प्रवेश देऊन आरोप धुवून काढा.
जनतेच्या पैशाने मोदी गॅरंटी देतात!
त्यासोबतच शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गॅरंटी देतो म्हणतात मात्र नागरिकांच्या पैशातून ते जाहिराती करत गॅरंटी देत असल्याचं शरद पवार म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, 'पक्ष स्थापने पासून आम्ही विचारधारा कधीच बदलली नाही. पण आज महात्मा गांधींना शिव्या देतात आणि जवाहरलाल नेहरूंबद्दल काहीही बोललं जातंय. ज्यांनी गांधी, सुभाषबाबू, जवाहरलाल नेहरू यांचं योगदान हे देश स्वतंत्र करण्यासाठी होतं. अशा लोकांची नोंद जाणकारांनी घ्यायचे असते. आज देशाचे पंतप्रधान प्रत्येक दिवशी पूर्ण पान जाहिरात देतायेत. त्यात मोदींची गॅरंटी देतायेत, पण ही कोणाच्या पैशाने जाहिराती दिली जातेय. जनतेच्या पैशाने हे गॅरंटी देतायेत.'
इतर महत्वाची बातमी-