Vasant More And Sanjay Rout In Pune: शिवसेना नेते संजय राऊत हे पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी मनसे नेते वसंत मोरे यांची भेट घेतली आहे. मागील काही दिवसांपासून वसंत मोरे हे मनसेवर नाराज असल्याचं चित्र दिसत होतं. मात्र आता वसंत मोरे आणि संजय राऊतांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. 


पुण्यात एका लग्नसोहळ्यात या दोन्ही नेत्यांची भेट झाली. संजय राऊत एका कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी एका लग्नसोहळ्यात हजेरी लावली. त्याच लग्नात वसंत मोरेसुद्धा उपस्थित होते. या भेटीदरम्यान त्यांनी वसंत मोरेंच्या कामाचं कौतुकदेखील केलं.


पुण्यात वसंत मोरे यांना तात्या नावाने ओळखलं जातं. त्यामुळे या भेटीत संजय राऊतांनी देखील तात्या नावाने हाक मारली. या सगळ्या घटनेमुळे पुण्यातील राजकीय वातावरण वेगळ्या वळणावर जाईल की काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान दोघांची भेट झाल्यानंतर निरोप देताना संजय राऊत यांनी भेटू असं म्हणत वसंत मोरे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली?, असं मत उपस्थितांनी व्यक्त केलं आहे.


राज ठाकरे यांच्या भोंगा आंदोलनावर  वसंत मोरे नाराज होते. त्यांनी ती नाराजी माध्यमांसमोर बोलून दाखवली होती. माझ्या प्रभागात मुस्लिम बहूल नागरिक अधिक आहेत. त्यांना त्रास होऊ नये, त्यामुळे म्हणून मी भोंग्याला विरोध करतो आहे, असं स्पष्ट मत त्यावेळी वसंत मोरेंनी यांनी व्यक्त केलं होतं. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वसंत मोरेंकडून शहराध्यक्ष पद काढून घेतलं होतं. मनसेचे कार्यकर्ते साईनाथ बाबर यांची पुणे शहराच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती केली होती.


शहराध्यक्षपद काढून घेतल्यानंतर वसंत मोरे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, असं त्यांनीच माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. मात्र आता संजय राऊतांच्या भेटीनंतर वसंत मोरे शिवबंधन बांधणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.