MSRTC Shivai Bus : राज्याची लाइफलाइन म्हणून ओळख असलेले लाल परी आता नव्या रुपात प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यातील पहिली इलेक्ट्रीक बस 'शिवाई' प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. एसटी महामंडळाच्या स्थापना दिनाच्या दिवशी शिवाई बसचा लोकार्पण सोहळा पार पडला. एसटी महामंडळातील पहिली एसटी इलेक्ट्रीक बस पुणे-अहमदनगर दरम्यान धावणार आहे. 


विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, एसटी मंडळाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत आज लोकार्पण सोहळा पार पडला. या लोकार्पण सोहळ्यात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, राज्यात 1932 मध्ये खासगी सेवा सुरू झाली होती. त्यानंतर एक जून 1948 मध्ये एसटी महामंडळाची बस धावली. परदेशांमधील बसेस प्रमाणे ही नवीन बस असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वी एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुद्धा झाला नंतर त्याला मार्ग मिळाला. पण आता याला कोणाची दृष्ट लागू देऊ नका असे आवाहनही अजित पवार यांनी केले. राज्यात टप्प्याटप्प्याने ल शिवाई बसेस सुरू होणार असल्याचेही त्यांनी म्हटले.  


पुणे-नगर असा खासगी कारने प्रवास करणारेदेखील शिवाई बसने प्रवास करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गेल्या दोन वर्षापासून लॉकडाउनच्या काळात एसटीला मोठी किंमत मोजावी लागली. एस टी च उत्पन्न वाढवण्यासाठी राज्य सरकारने मार्ग शोधले आहेत. राज्य सरकार एसटी महामंडळासोबत असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली. 


वडाच्या झाडाची खास आठवण


पुण्यातील शंकर शेठ रोडवरील एसटी महामंडळ विभागाचे पुणे विभागीय कार्यालय आहे. या कार्यालयाच्या आवारात असलेल्या वडाच्या झाडापासून 1 जून 1948 रोजी पुणे ते अहमदनगर अशी बस धावली होती. या प्रवासाला आज 75 वर्ष पूर्ण होत आहे. त्याच  साधत एस.टी विभागा मार्फत पुणे ते अहमदनगर 'शिवाई इलेक्ट्रिक' बसचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत झाले आहे.


या इलेक्ट्रिक बसची वैशिष्टे 


शिवाई इलेक्ट्रिक बसची लांबी 12 मीटर आहे. आतील बाजूस 2 आणि बाहेरील बाजूस 1 असे कॅमेरा आहेत. या बससाठी 10 बॅटरी असून एकदा चार्ज केल्यावर 200 ते 250 किलोमीटर धावणार आहे. या बसमधील आसनक्षमता 43 प्रवाशांची आहे. ध्वनी व प्रदुषणविरहीत तसेच वातानुकूलीत बस असणार असून प्रवाशांना गारेगार प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.  ही बस ताशी 80 किमी वेगाने धावणार आहे. 'शिवाई'च्या  पुणे –अहमदनगर –पुणे मार्गावर दिवसाला 6 फेऱ्या होणार आहेत.


अहमदनगरमधून शिवाईला हिरवा झेंडा


अहमदनगर येथून पहिल्या शिवाई ई-बसला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि शहराच्या प्रथम नागरिक महापौर रोहिणी शेंडगे यांनी हिरवा झेंडा दाखवला. एसटी महामंडळाच्या स्थापनेनंतर 1 जून 1948 रोजी पहिली एसटी बस पुणे-अहमदनगर दरम्यान धावली होती. या पहिल्या बसचे वाहक लक्ष्मण केवटे हे देखील या ई-बसला हिरवा झेंडा दाखविण्यासाठी आले होते.