PCMC English Medium School :  वर्ल्ड बेस्ट स्कूल (World’s Best School Prize) पारितोषिकाच्या अंतिम फेरीतील तीन शाळांमध्ये पुण्यातील (Pune) एका शाळेला स्थान देण्यात आलं आहे. पुणे जिल्ह्यातील बोपखेल गावातील पीसीएमसी इंग्लिश मीडियम स्कूलला पहिल्या तीनमध्ये स्थान मिळालं आहे. या शाळेमुळे समाजातील लोकांचे नाते संस्कृतीशी जोडले गेले आहे. पीसीएमसी शाळेची समुदाय सहयोग (Community Collaboration)  श्रेणीमध्ये निवड झाली आहे. पीसीएमसी इंग्लिश मीडियम स्कूलच्या या यशामुळे पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. या अंतर्गत प्रत्येक श्रेणीतील विजेत्या शाळेला सुमारे दोन कोटी रुपयांची रक्कम दिली जाईल.


पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणून जगभरात ओळखलं जातं.  त्याच पुण्यातील पीसीएमसी इंग्लिश मीडियम शाळेने जगात आपलं नाव कमावलं आहे.  PCMC ची ही शाळा सार्वजनिक-खासगी भागीदारीद्वारे चालवली जाते.  त्यासाठी आकांक्षा फाऊंडेशन आणि स्थानिक सरकार यांच्यात करार झाला आहे.  या शाळेत शिकणारी बहुतांश मुलं गरीब कुटुंबातील आहेत.   


शिक्षणाचं महत्व पालकांना समजून सांगण्यासाठी पुढाकार


PCMC इंग्लिश मीडियम शाळा गरीब कुटुंबांना मदत करण्यासाठी स्थानिक डॉक्टर, दुकानदार आणि स्थानिक नेते यांच्यासोबत काम करते. PCMC शाळेने फ्री मेडिकल चेक-अप असा एक प्रोग्राम देखील सुरू केलाय.  याशिवाय स्कूल 'मास्टर शेफ' सारख्या  क्लासद्वारे लोकांची सुरक्षा आणि स्वस्त खानपान याबद्दलही जागरुक बनवते.  शाळेमध्ये विद्यार्थी स्वत:च्या आहारावर देखील लक्ष देतात. त्यांना एका आठवड्याच्या आहाराची माहिती दिली जाते. यानुसार विद्यार्थ्यांना आहार घ्यावा लागतो. या सगळ्या सवयींचा परिणाम त्यांच्या पुढील आयुष्यावर नक्कीच चांगला होईल, अशी खात्री या शाळेला आहे. पाल्यांना शिक्षणासाठी शाळेत पाठवण्यासाठी पालकांना याचं महत्व पटवून देण्याची गरज होती. आम्ही प्रत्येकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या पालकांशी संवाद साधला. त्यांना शिक्षणाचं महत्व पटवून दिलं, अशी माहिती या शाळेने दिलीय. 


वर्ल्ड बेस्ट स्कूल पारितोषिकाची सुरुवात T4 एजुकेशन, अमेरिकन एक्सप्रेस, टेमप्लेटॉन वर्ल्ड चैरिटी फाउंडेशन, एक्सेंचरसारख्या इतर संस्थांनी सुरुवात केली आहे. या पारितोषिकासोबतच इतर पाच विभांमध्ये सर्वोत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्यांना देखील पारितोषिक देण्यात येणार आहे. समुदायाचं सहकार्य, पर्यावरणीय समतोल, इनोव्हेशन, प्रतिकूलतेवर मात करणे, निरोगी जीवनाचे समर्थन करणाऱ्या जगभरातील शाळांची यात निवड केली आहे.


जनतेचं मत महत्वाचं...


जगातील पाच सर्वोत्कृष्ट शालेय पुरस्कारांपैकी प्रत्येकासाठी पहिल्या तीन स्पर्धकांना आता जनता आपलं मत देईल. तुमचं मत देण्यासाठी 2 ऑक्टोबर पर्यंत मुदत असेल. तुमचं मत www.worldsbestschool.org या वेबसाईटवर नोंदवू शकतात. विजेत्या शाळांच्या नावाची घोषणा ही 19 ऑक्टोबर 2022 रोजी जगतील शिक्षक सप्ताहात होईल. विजेत्या शाळांना 2,50,000 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस समान प्रमाणात विभागून दिले जाईल. प्रत्येक शाळेस 50,000 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस दिले जाईल.