पुणे: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता नाराजीनाट्या मतदारसंघावर दावे प्रतिदावे होत असल्याचं चित्र आहे. अशातच पुण्यातील काही जागांचा पेच निर्माण झाल्याचं चित्र आहे. पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना वगळून आपल्याला उमेदवारी मिळेल, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला तसे आश्वासन दिल्याचा दावा भाजपचे माजी आमदार जगदिश मुळीक यांनी केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीमधे निर्माण झालेला तिढा वाढतच चालला असल्याचं चित्र आहे. याठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना एबी फॉर्म दिलेला असला तरी पक्षाकडून अद्याप त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत सुनील टिंगरेंचे नाव देखील नाही. दुसरीकडे या मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळेल असा दावा भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला आहे.  


वडगाव शेरीमध्ये उमेदवारी मिळण्याबाबत काय म्हणाले जगदीश मुळीक?


एबीपी माझाशी बोलताना वडगाव शेरीचे भाजपचे इच्छुक उमेदवारी जगदीश मुळीक म्हणाले, वडगाव शेरीमध्ये भाजपचं संघटन चांगलं आहे, वडगाव शेरीच्या नागरिकांना आणि कार्यकर्त्यांची भावना ही आहे, तर मतदारसंघातील नागरिकांना स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार हवा आहे. त्याचबरोबर परिसरातील सर्व समस्या, भ्रष्टाचार कमी करणारा उमेदवार हवा आहे, असंही यावेळी जगदीश मुळीक म्हणाले आहेत, तर या मतदारसंघातील उमेदवारीबाबत वरिष्ठांशी चर्चा झालेली आहे. येत्या दोन दिवसात या मतदारसंघाबाबतचा निर्णय जाहीर होईल. हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आल्यास आम्ही १०० टक्के जिंकू असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 


टिंगरे यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे, मात्र, उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही, त्याबाबत बोलताना जगदीश मुळीक म्हणाले, मतदारसंघात हवं त्याने तिकिट मागितलं पाहिजे, महायुतीत असलेल्या सर्व पक्षातील इच्छुक उमेदवारांपैकी कोणीही तिकीट मागितलं तरी चालेल, मात्र, पक्षश्रेष्ठींचा निर्णय याबाबत महत्त्वाचा आहे. तो जो निर्णय घेतील तो मान्य आहे. मात्र, अद्याप या मतदारसंघात कोणालाही उमेदवारी जाहीर झालेली नाही. वडगाव शेरीबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही, एकदोन दिवसात चित्र स्पष्ट होईल, दोन दिवस वाट पाहू असं जगदीश मुळीक यांनी म्हटलं आहे.


सुनील टिंगरेंना अजित पवारांचा फोन


सुनील टिंगरे पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातील आमदार आहेत. कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघातामध्ये सुनील टिंगरे यांची भूमिका वादग्रस्त राहिली होती. त्यामुळे सुनील टिंगरे यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार असल्याचे सांगितले जाते. सुनील टिंगरे यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधताना याबाबत भाष्य केले. त्यांनी म्हटले की, मला अजित पवारांनी तयारी करायला सांगितली आहे. वडगाव शेरीच्या जागेवर माझाच दावा आहे . काल रात्री मला अजित पवारांचा फोन आला होता. आज संध्याकाळपर्यंत दुसरी यादी येईल. या यादीत माझं नाव असेल, असा मला विश्वास असल्याचे टिंगरे यांनी सांगितले. वडगाव शेरी मतदारसंघातून भाजपचे नेते जगदीश मुळीकही इच्छूक आहेत. यावर बोलताना टिंगरे यांनी म्हटले की, असे अनेक जण इच्छुक असतात, ते सुद्धा तयारी करतात. मैत्रीपूर्वक लढत होऊ शकत नाही. इतर मतदारसंघांमध्ये देखील यामुळे अडचण होऊ शकते, असा गर्भित इशारा सुनील टिंगरे यांनी दिला.