Ashadhi Wari :  बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय’ च्या गजरात सोमवारी देहूनगरी दुमदुमली.  टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर... तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका... अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज (Saint Tukaram) पालखी सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान केले.  महापूजेनंतर पालखीने इनामदार वाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केले. 


दोन वर्षानंतर पायी वारी (Ashadhi Wari 2022) होत असल्याने वारकऱ्यांमध्ये अमाप उत्साह यावेळी होता. गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारी रद्द झाली होती. यंदा कोणत्याही निर्बंधाविना वारी होत असल्याने भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.  विठूरायाच्या भेटीसाठी वारकरी आतूर झाले आहेत आणि आता पांडुरंगाच्या भेटीला जाण्यासाठी भक्त सज्ज झाले आहेत.


ऊन वारा पावसाची पर्वा न करता विठूनामाचा गजर करत वारकरी पंढरीच्या दिशेने रवाना झाले आहे. पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून खास व्यवस्था ठेवण्यात आली आहे. याशिवाय डॉक्टर आणि अम्ब्युलन्सचं पथकही सोबत असणार आहे.  आज विठूनामाचा गजरात देहूनगरी दुमदुमून गेली. 


देहू मंदिरात खासदार श्रीरंग बारणे यांनी सपत्निक पादुकांचे पुजन आणि आरती केली. यावेळी आमदार रोहित पवार, सुनील शेळके, माजी आमदार उल्हास पवार यांच्यासह बारामती हाय-टेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार पूजेला उपस्थित होते. त्यानंतर उपस्थित सर्वजण वारकऱ्यांसह टाळ-मृदुंगाच्या गजरात दंग झाले. यावेळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. नितीन मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक मोरे उपस्थित होते. 


संबंधित बातम्या :