पुणे : पुण्यात लागू असलेल्या निर्बंधांमधून पुणेकरांना कोणतीही सुट मिळणार नाहीय. आज (शनिवारी 31 जुलै) महापालिकेकडून जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीत आधीच्या निर्बंधांपेक्षा कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. पुण्यातील दुकाने आणि हॉटेल्स सुरु ठेवण्याची वेळ चार पर्यंतच असणार आहे. पुण्यातील निर्बंध शिथील करण्याबाबत येत्या काही दिवसांत विचार केला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजीत पवार काल (शुक्रवारी) म्हणाले होते. मात्र, आज जाहीर झालेल्या निर्बंधांमधे आधीपेक्षा कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
काय आहे नियमावली?
- पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोविड 19 च्या प्रसारात प्रतिबंधित करण्यासाठी 26 जून, 2 जुलै आणि 15 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना पुढील आदेश येईपर्यंत लागू असणार आहेत.
- पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांचे नियमित वर्ग पुढील आदेशापर्यंत पूर्णतः बंद राहतील. मात्र, ऑनलाईन शिक्षणास मुभा राहिल.
- सदर आदेश हे पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये येणाऱ्या पुणे कटक मंडळ आणि खडकी कटक मंडळ यांनाही लागू राहतील.
- तसेच वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश आणि मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.
पुण्यात काय सुरु काय बंद
- पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.
- अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरु राहतील तर शनिवार रविवार पूर्णपणे बंद राहतील.
- मॉल्स, सिनेमागृहं संपूर्ण बंद.
- रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने आणि शनिवार रविवार फक्त पार्सल सेवा 11 पर्यंत.
- उद्याने, मैदाने, जॉगिंग, रनिंग आठवड्यील सर्व दिवस पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत.
- खाजगी कार्यालयं कामाच्या दिवशी पन्नास टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत.
- अत्यावश्यक सेवा संबंधी शासकीय कार्यालयं शंभर टक्के क्षमतेने.
- लग्नसमारंभाला 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी, कोविडसंबंधी सर्व नियम पाळणं आवश्यक
- अंत्यसंस्कार, दशक्रिया विधी व त्यासंबंधित कार्यक्रमांना 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी
- पुण्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद, धार्मिक स्थळांवर नित्योपचार पूजेला परवानगी
- कृषी संबंधित दुकाने आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील