Pune Measles News : पुण्यात (Pune) गोवरचे (Measles) पाच रुग्ण आढळले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील कुदळवाडी या भागात पाच गोवरचे रुग्ण आढळले. एकाच परिसरात गोवरच्या रुग्णांची संख्या वाढल्याने महापालिका दक्ष झाली आहे. त्यासाठी नागरिकांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आलं असून मुलांना बुस्टर डोस देण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील कुदळवाडी परिसरात 29 संशयित रुग्ण आढळले होते. या सगळ्यांची रक्त तपासणी करण्यात आली होती. त्यातील पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 9 वर्षांपर्यंतच्या बालकांचा समावेश आहे. दोन बालकं एक ते चार तर दोन बालकं पाच ते नऊ वयोगटातील आहे. मात्र या पाचपैकी एकाही बालकाला गंभीर लक्षण नसल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र गावात अजून रुग्ण वाढू नये यासाठी महापालिकेकडून खबरदारी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
Maharashtra Pune Measles Cases : लसीकरणावर भर
कुदळवाडीमध्येच नाही तर पुण्यातील इतर गावात गोवरचे रुग्ण वाढू नये, यासाठी मोठ्या उपाययोजना राबवण्यात येत आहे. त्यात सगळ्यात आधी लसीकरणावर भर दिला जात आहे. ज्या मुलांनी लस घेतली नाही आहे. त्यांना लसीबाबात जनजागृती करुन लस दिली जात आहे आणि ज्या मुलांंनी लसीची मात्रा घेतली आहे. त्यांना बुस्टर डोस दिला जात आहे. रोज किमान साडे तीनशे मुलांना बुस्टर डोस देण्यात येत आहे.
Maharashtra Pune Measles Cases : रुग्णालयांमध्ये तयारी सुरु
गोवरचे रुग्ण वाढल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी महापालिकेचे पूर्ण प्रयत्न सुरु आहेत. महापालिकेच्या रुग्णालयामध्ये गोवरच्या रुग्णांसाठी सुसज्ज खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यात आकुर्डीच्या रुग्णालयात 10 खाटा आणि जिजामाता, थेरगाव, भोसरी या सगळ्या रुग्णालयात पाच खाटा ठेवण्यात आल्या आहेत. यासोबतच 30 आयसोलेशन खाटांची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे गोवर रोखण्यासाठी पालिकेकडून मोठ्या उपाययोजना केल्या जात आहे.
Maharashtra Measles Cases : मुंबईसह राज्यात गोवरचा प्रादुर्भाव
मागील काही दिवसांत मुंबईत गोवरच्या रुग्ण्यांची संख्या झपाट्याने वाढच आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत झाली आहे. मात्र राज्यभरात अनेक शहरात गोवरचे रुग्णदेखील वाढत आहे. मात्र त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबादारी प्रशासनाने घेतली आहे. त्यासाठी लसीकरण आणि बुस्टर डोस जास्त प्रमाणात देण्याची गरज आहे. त्यामुळेच गोवर रोखण्यास मदत होणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.