Ajit Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि त्यांच्या मिश्किल टिपण्ण्यासाठी कायम चर्चेत असतात. आजदेखील त्यांनी अशीच मिश्किल टिप्पणी करत सभागृहातील सगळ्यांना हसण्यास भाग पाडलं. कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांना बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचे आवाहन त्यांनी बारामतीकरांना केलं आणि त्यानंतर दिवसा मतदान करा, यात्रा-जत्रा रात्री, काय कापाकापी करायची, तमाशा बघायचा तो रात्री बघा, त्या गौतमी पाटील बाईला बोलवा, अशी मिश्किल टिप्पणी केली. 


बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला अजित पवार उपस्थित होते. त्यावेळी बोलताना त्यांनी गोतमी पाटील हिला सल्लादेखील दिला. ते म्हणाले की, गोतमी पाटील हिने डान्स करावा, पण सगळ्यांना बघता यावं असा डान्स करावा. काही दिवसांपूर्वी त्यांनी गौतमी पाटीलवर टीका केली होती आणि आज त्यांनी थेट गौतमी पाटीलला सल्ला दिल्याने चर्चेला उधाण आलं आहे.


माझं आणि बारामतीचं नातं तयार झालंय....


काही दिवसांपूर्वी माझ्याविषयी अनेक बातम्या पसरवण्याचं काम अनेक माध्यमांनी केलं आहे. जरा कुठे काही केलं किंवा कुठे गेलं तर लगेच अजित पवार नॉट रिचेबलच्या बातम्या करुन मोकळे होतात. हे पत्रकार माझ्याच मागे का लागतात माहित नाही.  एखाद्याच्या मागे लागायचं म्हणजे किती मागे लागायचे?. मी कोणतंही वक्तव्य केलं तर मला असं का बोलले विचारतात. मी माझ्या मनात जे येतं ते बोलतो. अनेकांना मी 2019 मध्ये केलं तसं करतो की काय अशी शंका येते. त्यामुळे मी स्पष्ट सांगतो की कायम राष्ट्रवादीतच राहणार. अजित पवार आणि बारामती असं नातं तयार झालं आहे. माझ्यासंदर्भात येणाऱ्या बातम्यांकडे लक्ष देऊ नका, असं त्यांनी खडसावून सांगितलं.


'मी सरकारला कोणताही सॉफ्ट कॉर्नर देत नाही'


मी विशिष्ट नेत्यांच्या बाबतीत सॉफ्ट आहे, असं बोललं जातं. साहेबांनी दिलेला सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आपण पुढे घेऊन जाण्याचे काम करतो आहे. एखाद्या माझ्या विचाराचा नसेल तर त्याच्या मानगुटीला पकडू का? अनेक राज्यात विधानभवनात हाणामारी होते. मी सरकारला कोणताही सॉफ्ट कॉर्नर देत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. कंगना राणावतचा सिनेमा आहे, तुम्हाला वाटेल मला कसं माहिती कंगना राणावत. तुम्हाला जसे सिनेमा पाहावा असे वाटते तसे मला देखील पाहावं वाटतं, असंही ते म्हणाले.